पुणे – पुणे महापालिका आणि “स्वच्छ’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने “व्ही कलेक्ट’ मोहीम राबवण्यात आली. त्यातून सहा टन ई-कचरा आणि जुन्या वस्तू नागरिकांकडून गोळा करून लॅंडफिलला जाण्यापासून रोखण्यात आल्या.
स्वातंत्र्यदिनानिमित्त, पुणे महापालिकेच्या साथीने आयोजित केलेल्या 23 हून अधिक संकलन मोहिमांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी जुने कपडे, पुस्तके, भांडी आणि ई-कचरा रिसायकलिंग आणि पुनर्वापरासाठी देत या मोहिमांमध्ये आपला सहभाग नोंदवला.
करोनामुळे गेल्या वर्षीपासून नागरिकांचे घरातून काम करण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वापरात वाढ झाली. 2018-2019 च्या तुलनेत महिन्याच्या सरासरी ई-कचऱ्यात पाचपट वाढ झाली आहे. 2021 साली आतापर्यंत एकूण 19.5 टन ई-कचऱ्याचे संकलन स्वच्छ “व्ही-कलेक्ट’च्या माध्यमातून झाले आहे.कचऱ्याच्या समस्येपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुनर्चक्रीकरण आणि पुनर्वापराला चालना देणारा “व्ही-कलेक्ट’ हा उपक्रम “स्वच्छ पुणे’ गेल्या 10 वर्षांपासून राबवत आहे. “व्ही-कलेक्ट’मध्ये आलेला ई-कचरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकृत रिसायलकडे पुनर्चक्रीकरण किंवा विल्हेवाटीसाठी पाठवला जातो. वापरण्या योग्य इलेक्ट्रॉनिक वस्तू कचरावेचकांसाठी वापरले जाते. शालेय शिक्षण ऑनलाइन झाल्यामुळे कचरावेचकांच्या मुलांना मोबाइल आणि लॅपटॉपची गरज भासते.
नागरिकांनी “व्ही-कलेक्ट’मध्ये दिलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे कचरावेचकांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत होत आहे. वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या यामुळे “व्ही कलेक्ट’मधील महिन्याचे सरासरी संकलन वाढत आहे. मागील दोन वर्षांमध्ये हा आकडा एक ते दीड टन एवढा होता. तर, 2020-2021 मध्ये सरासरी संकलन पावणेपाच टन एवढे संकलन दार महिन्याला होत आहे.
– हर्षद बर्डे, संचालक, “स्वच्छ’
15 ऑगस्ट रोजी शहरात विविध ठिकाणी झालेल्या संकलन मोहिमांमधून एका दिवसात अंदाजे 6 टन वजनाच्या जुन्या वस्तू पुनर्वापर आणि रिसायकलिंगसाठी गोळा करण्यात आल्या. आपण नेहमी युरोप आणि इतर देशांतील पुनर्वापराला चालना देणाऱ्या दुकानांची उदाहरणे देतो. तसाच कार्यक्षम उपक्रम, स्वच्छ “व्ही कलेक्ट’ आपल्या शहरात गेली अनेक वर्षे राबवला जात आहे. आपण अधिकाधिक सहभाग नोंदवून या उपक्रमाला प्रोत्साहन द्यायला हवे.
– माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेविका