तबलिगी मरकजमधून आलेल्या दोघांना “करोना’ची लागण
पहिल्या बारापैकी 11 करोनाबाधित झाले ठणठणीत
पिंपरी – दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 23 आणि त्यांच्या पाच नातेवाइकांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या 28 पैकी 2 जणांना “करोना’ची लागण झाली आहे. यामुळे शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढली असून “करोना’मुक्तीचे प्रयत्न लांबणीवर पडले आहेत. गुरुवारी मरकज येथून आलेल्या आणि करोनाची लागण झालेल्यांच्या अति संपर्कात (हाय रिस्क कॉन्टॅक्ट) आलेल्या सहा जणांना आज महापालिका रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवले आहेत.
दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात तबलिगी जमातने घेतलेल्या कार्यक्रमात शहरातील काही नागरिक सहभागी झाले होते. तसेच भारताच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. कार्यक्रमातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. मरकजमध्ये जाऊन आलेले आणि त्यांच्या नातेवाईक असे एकूण 28 नमुने बुधवारी तपासणीसाठी “एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले होते. त्यातील 28 पैकी दोन जणांचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर, बाकीचे 26 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.
दिल्लीच्या निजामद्दीन भागातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये 33 नागरिक आले आहेत. दिल्लीवरून आलेल्या 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
शहरामध्ये करोना विषाणूला रोखण्यामध्ये प्रशासनाला यश आले होते. मागील बारा दिवसांत एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नव्हता. मात्र आता दिल्लीवरून आलेले संशयित पॉझिटिव्ह आडळले आहेत. तसेच त्यातील काहीजण अजूनही बेपत्ता आहे. त्यांना शोधण्यासाठी महापालिका प्रशासनाचे युद्धपातळीवर काम सुरु आहे. दरम्यान नियंत्रणात आणलेली परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याच्या भीतीने प्रशासनाची झोप उडाली आहे.
आणखी एक रुग्ण करोनामुक्त
पिंपरी चिंचवड शहरात पहिले 12 रुग्ण आढळले होते. त्या 12 रुग्णांपैकी 11रुग्ण बरे झाले आहेत. 10 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज गुरुवारी एका रुग्णाचा दुसरा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे त्यामुळे तो करोनामुक्त झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यात शहरातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन आहे. दिल्ली येथील संशयितांपैकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने संख्या वाढली आहे. गुरुवारी निगेटिव्ह अहवाल आलेला व्यक्ती फिलिपिन्स येथून प्रवास करून आला होता. त्याला 14 मार्च रोजी रुग्णालयात दाखल केले होते. चौदा दिवसांच्या उपचारानंतर त्याचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.