तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत सहा नक्षलवादी ठार झाले आहेत. सोमवारी सकाळी 6.30 च्या सुमारास सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. तेलंगणा पोलीस, छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफचे जवानांच्या संयुक्त कारवाईला हे यश आले आहे.
तेलंगणातील भद्राडी कोठागुडेम जिल्ह्याचे एसपी सुनील दत्त यांनी सांगितले की, दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या किस्ताराम पोलीस स्टेशन परिसरातील जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत नक्षलवादी ठार झाले आहेत. या कारवाईत तेलंगणा पोलीस, छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफचे जवान सहभागी होते.
शोध मोहिमेदरम्यान नक्षलवादी सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. ही माहीती मिळाल्यानंतर संयुक्त मोहिमेअंतर्गत नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यात आली. पोलिस आणि सीआरपीएफ जवानांची अद्यापही नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरूच आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे, परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. अशी माहिती एसपी सुनील दत्त यांनी दिली आहे.