मुदत संपल्याने महिला कर्मचाऱ्यांकडून अडवणूक ः स्पर्धा परीक्षेची तयारी करताहेत विद्यार्थी
पिंपरी – सांगवी येथील शहीद अशोक कामटे स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेमधील विद्यार्थ्यांना अखेर सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात होती. ही अडवणूक रोखून मुदतवाढ मिळण्यासाठी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी विद्यार्थ्यांसोबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची सोमवारी (दि.3) भेट घेतली. पाटील यांनी या विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मुदतवाढ दिली आहे. यामुळे या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
महापालिकेतर्फे शहरातील तसेच ग्रामीण भागातील तरुणांसाठी शहरात विविध ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत. या केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी या केंद्रामधून अभ्यास करुन विविध स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करुन पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक वाढवित आहेत. मात्र सांगवी येथील शहीद अशोक कामटे स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे.
“मुदत संपलेली आहे, त्यामुळे तुम्ही अभ्यासिकेमध्ये येऊ नका’ असे या परीक्षा केंद्रातील कर्मचारी वर्गांकडून सांगितले जात आहे. या विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. शहरात एकूण सात ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्रे चालविली जात आहे. इतर ठिकाणी अशी कुठल्याही प्रकारची अडवणूक केली जात नाही. परंतु सांगवी परीक्षा केंद्रामध्येच अशा प्रकारचे नियम लागू केले आहेत. त्यामुळे दोन वर्षे त्यांनी केलेली मेहनत वाया जाईल, ही बाब साने यांनी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.