चाकण शहरात सहा सावकारांना अटक

चाकण – चाकण व परिसरातील खासगी सावकारांकडून लाखो रुपये व्याजाने घेतलेल्या कर्जदारांकडून व्याजाचे पैसे वसूल करून देखील सावकारांनी मिळून कर्जदाराला जादा व्याजाचा तगादा लावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना आनंद नगर सोसायटी, रोहकल रोड, चाकण येथे घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी सहा खासगी सावकारांना अटक केली आहे.

मंदार परदेशी, रंगा ठोंबरे, गारगोटे सर, अस्लम शेख, सचिन शेवकरी, दत्ता खेडकर (सर्व रा. चाकण) अशी अटक केलेल्या सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी माधुरी विशाल सायकर (वय 25) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

चाकण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, माधुरी यांचे पती विशाल यांनी 2017साली मंदार परदेशीकडून दरमहा आठ टक्के दराने पाच लाख रुपये, रंगा ठोंबरे याच्याकडून दरमहा आठ टक्के दराने तीन लाख रुपये, गारगोटे याच्याकडून दरमहा पाच टक्के दराने पाच लाख रुपये, अस्लमकडून सात रुपये टक्‍क्‍यांनी सहा लाख रुपये, सचिन आणि दत्ता या दोघांकडून दहा रुपये टक्‍क्‍यांनी सहा लाख रुपये आणि महालक्ष्मी फायनान्सचे तीन लाख रुपये सहा रुपये टक्‍के व्याजदराने घेतले. वरील सर्व खासगी सावकारांकडून विशाल सायकर यांनी एकूण 28 लाख रुपये व्याजाने घेतले. त्याचे व्याज त्यांनी वेळोवेळी दिले. तरीही यातील काही सावकारांनी त्यांच्या दुकानावर येऊन तसेच फोनवरून पैशांबाबत तगादा लावला.
शनिवारी (दि. 8) रात्री साडेदहाच्या सुमारास सचिन शेवकरी, दत्ता खेडकर या दोघांनी सायकर यांच्या घरात घुसून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत त्यांच्या पत्नी माधुरी यांनी चाकण पोलिसांत तक्रार नोंदवली.

चाकण पोलिसांनी सहा खासगी सावकारांना अटक केली असून त्यांच्यावर चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.