सातारा – हिवरवाडी (ता.खटाव) येथील अँड.प्रल्हाद दादासो सावंत यांच्या बंद घराचे कुलूप तोडून जवळपास सहा लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी सावंत यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अँड.सावंत यांचे आई व वडील हे दोघे हिवरवाडी येथे वास्तव्यास असतात, तर स्वतः अॅड.सावंत व त्यांचे बंधू वडूज येथे वास्तव्यास आहेत. गेल्या आठवड्यात अँड. सावंत यांच्या वडिलांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाल्याने त्यांचे कुटुंब सध्या वडूज येथे वास्तव्यास होते.
दरम्यान काल दि.10 रोजी रात्री त्यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील सहा लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. सदर घटना सोमवारी सकाळी सावंत यांच्या चुलत भावाने त्यांना फोन करून घराचे दार उघडे असल्याची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सावंत यांनी हिवरवाडी येथील घराची पाहणी करून वडूज पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. पुढील तपास महिला फौजदार शीतल पालेकर या करत आहेत.