एकास अटक; दोन जण फरार
कराड (प्रतिनिधी) – कराड-तासगाव रस्त्यावर तिघेजण चारचाकी गाडीतून विदेशी दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी कारवाई केली. यामध्ये एकास अटक केली असून अन्य दोघेजण फरारी झाले आहेत. त्यांच्याकडून सुमारे साडेसहा लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदानंद दत्तात्रय यादव (रा. घोटी, ता. म्हाडा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर गणेश शेळके (रा. बेंबळे, ता. म्हाडा, जि. सोलापूर), जयवंत पाटील (रा. कार्वेनाका, कराड) अशी फरार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड ते तासगाव रस्त्यावर फक्त गोवा राज्याकरीता विक्रीसाठी असे लिहलेल्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची बातमी राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या बातमीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका चारचाकी वाहनातून सदानंद यादव, गणेश शेळके, जयवंत पाटील हे तिघेजण विदेशी मद्याची वाहतूक करत होते.
यावेळी राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांनी गाडीची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या विविध प्रकारच्या मद्याची 50 बॉक्समध्ये 2400 बाटल्यांचा साठा मिळून आला. पोलिसांनी चारचाकी गाडीसह विदेशी मद्याच्या बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या. सदरची कारवाई दारूबंदी विभागाचे निरीक्षक राजेंद्र पाटील, दुय्यम निरीक्षक शिरीष जंगम, प्रताप बोडेकर, रोहित माने, श्रीनिवास पाटील, सचिन बावकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रशांत गायकवाड, विनोद बनसोडे, शंकर बक्केवाड, अमोल खरात, महिला पोलीस राणी काळोखे यांनी केली.