महिन्याभरात करोनामुक्तीचा वेगही; दोन टक्कयांनी घसरला
पुणे -विभागामध्ये गेल्या 24 तासांत 2 हजार 384 नवीन बाधित सापडले. तर, 2 हजार 54 बाधित करोनातून बरे झाले आहेत. आज, करोनामुक्त झालेल्या संख्येने सहा लाखांचा टप्पा पार केला. मात्र, मागील महिन्याभरात विभागात पुन्हा वाढत असलेल्या करोना बाधित संख्येमुळे करोनामुक्तीचा वेग दोन टक्कयांनी कमी झाल्याचे दिसून येते. आज, विभागात 6 लाख 36 हजार 259 बाधितांपैकी 6 लाख 1 हजार 854 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले.
वाढत्या बाधित संख्येमुळे सक्रीय बाधितांची संख्या 17 हजार 934 इतकी असून, आतापर्यंत 16 हजार 471 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विभागात मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के तर करोनामुक्तीचे प्रमाण 94.59 टक्के आहे, एक महिन्यापूर्वी हे प्रमाण 96 टक्कयांच्या पुढे होते.
मागील 24 तासात सापडलेल्या बाधित संख्येमध्ये एकट्या पुणे जिल्ह्यात 2 हजार 112, सातारा जिल्ह्यात 66, सोलापूरमध्ये 142, सांगलीत 36 तर कोल्हापूर जिल्ह्यात 28 बाधित सापडले, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.