चंदीगड – जिंद-चंदीगड मार्गावर कांडेला गावाजवळ मंगळवारी सकाळी ट्रक आणि पिकअप वाहनाची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कुटुंबातील एका सदस्याच्या मृत्यूनंतर हे लोक हरिद्वारला त्यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन करण्यासाठी गेले होते आणि तेथून परतत असताना त्यांच्या वाहनाची ट्रकला धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपजारादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. इतर 17 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चन्नो (45), शीशपाल (39), अंकुश (15), धन्ना (70) आणि सुरजी देवी (65) अशी मृतांची नावे आहेत आणि यात पंजाबमधील आणखी एक व्यक्ती आहे.
दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून चालकाचा शोध घेणे सुरु आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस अधिक तपास करत आहेत.