ट्रकखाली दबून सहा मुलींचा मृत्यू

बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील दुर्घटना

गोपालगंज: फरशांनी भरलेला ट्रक अंगावर कोसळल्याने 6 मुलींचा जागीच मृत्यू झाला.रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या काही मुलींच्या अंगावर फरशा घेऊन जाणारा ट्रक कोसळल्याची भीषण घटना समोर आली आहे. बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात घडलेल्या या दुर्घटनेत सहा निष्पाप मुलींचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी काही मुलेही जखमी झाल्याचे बोलले जात आहे.

बलौरी पोलीस स्टेशनचे प्रभारी सुमन मिश्रा यांनी सांगितले की, गोपालगंजहून टाईल्सने भरलेला एक ट्रक सरेया नरेंद्र गावाजवळून जात होता. यावेळी रस्त्यावर नुकतेच डागडुजीचे काम झाले होते. त्यामुळे ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला.

तर स्थानिक ग्रामस्थांच्या मते, ही दुर्घटना घडली त्याच्याआधी काही मुलींनी घटनास्थळी आपल्या शेळ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या आणि त्या रस्त्यांच्या बाजूला बसल्या होत्या. यावेळीच नेमके चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो थेट त्यांच्या अंगावरच कोसळला. या अपघातात सहा मुलींचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या मुली 10 ते 15 वर्षे वयोगटातील होत्या. मृत्यू पावलेलया सर्व मुली या सरैया नरेंद्र गावच्या बिहा नोनिया टोला येथील रहिवासी होत्या. या सर्वांचे मृतदेह गोपालगंज सरदार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हा ट्रक ओव्हरलोडेड होता. तसेच ज्या रस्त्यावरुन तो चालला होता त्या रस्त्यावर माती टाकण्याचे काम सुरु होते. मातीमुळे अवजड ट्रकची चाके मातीतं रुतली गेली आणि तो अनियंत्रित होऊन ही दुर्घटना घडली.

Leave A Reply

Your email address will not be published.