पुणे – गणेशोत्सवात दि. 7 ते दि. 12 सप्टेंबरदरम्यान रात्री 12 वाजेपर्यंत देखावे सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
विधानभवन येथे पाटील बोलत होते. मागील आठवड्यात शहरात झालेल्या दोन कार्यक्रमांमध्ये गणेश मंडळांकडून तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यामध्ये शहरातील देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक पुण्यात येतात. देखावे 10 वाजताच बंद होत असल्याने देखावे पाहायला मिळत नाही. त्यामुळे वेळ वाढविण्याची मागणी होत होती. त्यानुसार आता जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातील दोन दिवस वाढवून देण्यात आले आहे. त्यामुळे दि.7 ते दि. 12 सप्टेंबर असे सहा दिवस रात्री 12 वाजेपर्यंत देखावे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
डॉल्बीला नव्हे, आवाजाला विरोध डॉल्बी सिस्टीम वाजवून आवाज मर्यादेचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळावर कारवाई होणार आहे. दरम्यान डॉल्बी सिस्टीमला विरोध नाही तर आवाजाला विरोध असल्याचे पाटील म्हणाले.