नेवासा, राहुरी, संगमनेर, शिर्डी, श्रीगोंदा, श्रीरामपूरचा पेच सुटेना
नगर – नेवासा, राहुरी, संगमनेर, शिर्डी, श्रींगोदा, श्रीरामपूरचा तिढा अजुनही कायम असून पारनेर, कोपरगाव,नगर शहर, अकोले, कर्जत-जामखेड, शेवगाव-पाथर्डी लढती जवळपास निश्चित झाल्या आहेत. अर्ज भरण्यास अजून एक दिवसाचा कालावधी असून उद्या कोण-कोणत्या मतरदारसंघातून नवे अर्ज दाखल होतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. अर्ज आल्यानंतरही खरे चित्र मात्र सोमवारी दि.7 रोजी दुपारी स्पष्ट होईल.
नगर जिल्ह्यातील विधानसभेच्या 12 जागांसाठी कशा लढतील असतील याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.हे चित्र पूर्ण स्पष्ट झाले नसले तरी लढतीचे अंदाज निश्चित होऊ लागले आहेत..पारंपरिक लढतीचं बाराही मतदारसंघात आहेत..काही ठिकाणी झेंडे बदललेत पण खेळाडू तेच आहेत.तर काही ठिकाणी खेळाडू नवा दिसत असला तरी तो प्रस्थापित राजकारणाच्या मांडवाखालूनच गेलेला आहे.
दरम्यान,राष्ट्रवादी कॉंग्रेसची पहिली यादी काल रात्री उशिरा जाहीर झाली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील सहा जणांची उमेदवारी जाहीर झाली आहे. श्रीगोंदा येथील आमदार राहुल जगताप यांना उमेदवारी अद्याप जाहीर केली नाही.ते पुन्हा लढण्यास इच्छुक नसल्याचे समजते.तसेच राहुरी व नेवासा या जागाही प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. संगमनेर,शिर्डी व श्रीरामपूर या तीनच जागा इंदिरा कॉंग्रेसच्या वाट्याला जातील असे चित्र आहे.कर्जत-जामखेडची जागा कॉंग्रेसने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यासाठी सोडली आहे.ते पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी दोन हात करतील.
पारनेर – निलेश लंके,कोपरगाव – आशुतोष काळे,नगर शहर – आ.संग्राम जगताप,कर्जत – जामखेड – रोहित पवार,अकोले – किरण लहामटे ,शेवगाव-पाथर्डी-प्रताप ढाकणे हे राष्ट्रवादीचे सहा उमेदवार जाहीर केले आहेत.
साधारण कशा असतील लढती?
पारनेर : पारनेरमध्ये शिवसेनेकडून विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी तर त्यांच्यापासून दुर गेलेले निलेश लंके राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजीत झावरे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केले असून या दौघांपेैकी एक तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
कोपरगाव : कोपरगावमध्ये भाजपकडूनउ आमदार स्नेहलता कोल्ह तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आशुतोष काळे अयी लढत निशिच्त आहे. नगराध्यक्ष विजय वहाडणे व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यां दोघांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. ते लढणार की तलवारी म्यान करणार हे सोमवारी समजेलच.
नगर शहरः नगर शहरातून राष्ट्रवादीकडून आ. संग्राम जगताप,तर शिवसेनेकडून पुन्हा अनिल राठोड रिंगणात आहेत. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अर्ज नेऊन रंगत निर्माण केली आहे.तर किरण काळे वंचित आघाडीकडून लढणार आहेत. येथे भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांची भूमिका महत्त्वाची आहे.
श्रीगोंदा: भाजपकडून परत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर भाजपने विश्वास दाखवला आहे. मात्र राष्ट्रवादीकडून आमदार राहुल जगताप यांनी पुन्हा निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शविल्याने घनश्याम शेलार की राजेंद्र वा अनुराधा नागवडे यांना राष्ट्रवादी उमेदवारी देणार हे उद्या स्पष्ट होईल.मात्र नागवडे भाजपचे कमळ हाती घेण्याच्या मनस्थितीत आहेत. पाचपुते यांच्या विरोधात 2014 प्रमाणे पुन्हा सर्व विरोधक एकवटतील का हे महत्वाचे ठरेल.
अकोले ः भाजपकडून आ. वैभव पिचड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून किरण लहामटे लढणार आहेत. डॉ.अजित नवले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून इथे लढू शकतात.
संगमनेर: इंदिरा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांना पक्षाने परत मैदानात उतरविले असून त्यांच्याविरोधात शवसेनेचा उमेदवार इथे ठरेना.साहेबराव नवले यांच्या नावाची चर्चा आहे पण त्यास अधिकृत दुजोरा नाही.ते विखे यांचे समर्थक असून यापूर्वी थोरात यांच्या विरोधात लढले आहेत.विखे यांची भूमिका येथे महत्वाची आहे.मात्र त्यांना थोरात यांना टक्कर देणारा तगडा उमेदवार मिळेना.
शिर्डी : मंत्री राधाकृष्ण विखे(भाजप) विरुद्ध इंदिरा कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर नाही.इथे थोरातांची भूमिका महत्त्वाची..त्यांचे मेव्हुणे आ. डॉ.सुधीर तांबे व इतर थोरात यांच्या नातेवाईकांची नावे चर्चेत आहेत.संगमनेरमधून जसा थोरात यांच्या विरोधात विखेंना तगडा उमेदवार मिळाला नाही तसेच शिर्डीत थोरात यांना विखे यांना लढत देईल असा उमेदवार अजून सापडलेला नाही.
राहुरी : आ.शिवाजी कर्डीले (भाजप) विरुद्ध राष्ट्रवादी येथे प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.भाजपने देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांची भूमिका येथे महत्वाची ठरेल.पण ते पक्षा सोबतच राहतील असे चित्र आहे.
नेवासा : आ. बाळासाहेब मुरकुटे(भाजप) विरुद्ध शंकरराव गडाख(शेतकरी क्रांतिकारी पक्ष)असे चित्र असले तरी गडाख यांनाच राष्ट्रवादी परत घडयाळ बांधायला लावणार अशी आज दिवसभर चर्चा होती. तर दुसरीेकडे राष्ट्रवादी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना मैदानात उतरवणार असून त्यांचे नाव आज रात्रीपर्यांत निश्चित होईल असेही बोलले जात आहे. माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे नाव पण राष्ट्रवादीकडून चर्चेत होते.
श्रीरामपूर: शिवसनेने उमेदवारी दिलेले आ. भाऊसाहेब कांबळे कॉंग्रेसमधून सेनेत गेलेत..कॉंग्रेस येथे त्यांच्या विरोधात कोण उमेदवार देते अजून नक्की नाही .येथे स्व. जयंत ससाणे यांचे पुत्र उपनगराध्यक्ष करण ससाणे गटाची भूमिका महत्त्वाची ठरेल.कारण ससाणे भाजपात असले तरी कांबळे विरोधात त्यांनी भूमिका जाहीर केली आहे.
शेवगाव-पाथर्डी:आ. मोनिका राजळे(भाजप) विरुद्ध प्रताप ढाकणे(राष्ट्रवादी) अशी लढत होत असून येथे राष्ट्रवादीत बंडाळी होणार नाही कारण नरेंद्र व चंद्रशेखर घुले बंधू त्यांच्या समवेत आहेत पण भाजपात राजळे विरोधक एकत्रित मोट बांधत आहेत.
कर्जत-जामखेड: पालकमंत्री राम शिंदे(भाजप) विरुद्ध रोहित पवार(राष्ट्रवादी) ही लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.
या लढती ठरल्या
पारनेर ः विजय औटी शिवसेना निलेश लंके (राष्ट्रवादी कॉंग्रेस), कोपरगाव ः स्नेहलता कोल्हे (भाजप) आशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), नगर शहर ः संग्राम जगताप (राष्ट्रवादी कॉग्रेस) अनिल राठोड (शिवसेना), अकोले ः वैभव पिचड (भाजप) किरण लहामटे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), शेवगाव-पाथर्डी ः मोनिका राजळे (भाजप) प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), कर्जत-जामखेड ः राम शिंदे (भाजप) रोहित पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस).