भोर – भोर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे आधिकृत उमेदवार विद्यमान आमदार संग्राम थोपटे आणि महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांचेसह किरण दगडे, आणि कुलदीप कोंडे हे दोन उमेदवार महायुतीत बंडखोरी करुन निवडणुक रिंगणात उतरले आहेत. तर सैनिक समाजवादी पार्टीचे अनिल जगताप व दलित शोषित पिछाडी वर्गाचे लक्ष्मण कुंभार हेही निवडणूक रिंगणात उतरले असल्याने या सहा उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे चिञ स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकिसाठी दि. 29 रोजी झालेल्या छाननीत 16 अर्ज बाद करण्यात आले होते. तर 15 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. या 15 उमेदवारांपैकी आज (दि. 4) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे शेवटचे दिवशी. 9 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने 6 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून प्रचाराची रणधुमाळी उद्या दि. 5 नोव्हेंबरपासून सुरु होणार असली तरी प्रचाराला अवघे 13-14 दिवसच मिळणार असल्याने यातील काही उमेदवारांना मतदार संघात पोहचणेही अवघड जाणार आहे. हा मतदार संघ दुर्गम डोंगरी भागाने व्यापलेला असल्याने उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचणे मोठे जिकिरीचे ठरणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
हे उमेदवार रिंगणात –
संग्राम अनंतराव थोपटे, शंकर मांडेकर, किरण दगडे, कुलदीप कोंडे, अनिल जगताप, लक्ष्मण कुंभार हे 6 उमेदवार आपले नशिब आजमवणार आहेत.