सीतारामन यांची गडकरींकडून पाठराखण

नवी दिल्ली: वाहन उद्योगातील सध्याच्या मंदीला ओला आणि उबेरची सेवा कारणीभूत असल्याविषयी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्याचा माध्यमांकडून विपर्यास करण्यात आल्याचा दावा परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. ते म्हणाले की वाहन उद्योगाच्या सध्याच्या मंदीला अनेक घटक कारणीभूत आहेत, त्यात ओला, उबेर या कंपन्यांची कॅब सेवा हे एक कारण आहे असे त्यांना म्हणायचे होते. केवळ ओला, उबेर मुळेच वाहन क्षेत्रात मंदीचे दिवस आले आहेत असे त्यांना म्हणायचे नव्हते असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

गडकरी यांच्या हस्ते आज होंडा ऍक्‍टिव्हा 125 स्कुटरच्या बी6 आवृत्तीचे उद्‌घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की गेल्या अनेक महिन्यांपासून वाहन उद्योगातील व्यवसाय कमीकमी होत जाताना दिसत आहे. त्यांची अनेक कारणे आहेत. ई रिक्षा आल्यामुळे आयसीई रिक्षांचा खप कमी झाला आहे अशी अनेक कारणे त्याला देता येतील. देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारल्यामुळेही लोकांची वाहन खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे असे विधानही गडकरी यांनी केले.

वाहन उद्योग क्षेत्राला सरकारकडून काही वाढीव सवलती मिळाव्यात अशी मागणी होत आहे. वाहनांवरील जीएसटी दहा टक्‍क्‍यांनी कमी करावा अशीही सुचना केली जात आहे. पण त्या विषयीचा निर्णय जीएसटी कौन्सिलकडून होणे गरजेचे आहे. आम्ही त्या अनुषंगाने अर्थमंत्रालयाकडे पाठपुरावा करीत आहोत असेही ते म्हणाले. जीएसटी कमी करण्याविषयीचा निर्णय आता अर्थमंत्र्यांच्या कोर्टात आहे असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. वाहनांच्या स्क्रॅपिंग धोरणांच्या संबंधातही अर्थमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे असे त्यांनी सांगितले.

वाहन उद्योगात सध्या काही समस्या निर्माण झाल्या असल्या तरी हा ट्रान्झीशन पिरियड आहे असे ते म्हणाले. सध्या वाहन उद्योगात गेल्या दोन दशकांत नव्हती इतकी मंदी आली असून अनेक मोटार व दुचाकी उद्योगांमध्ये युनिट्‌स बंद करण्याची वेळ आली आहे त्यामुळे अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या विषयीच्या प्रश्‍नांनाच सध्या मोदी सरकारच्या मंत्र्यांना तोंड द्यावे लागत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×