सिताफळांची ‘गोडी’ अजूनही दूरच

पावसाने जीवदान, पण हंगाम लांबलेलाच

पुणे – लांबलेल्या पावसामुळे यंदा गोड सिताफळ उत्पादनाला फटका बसला असून हंगामही लांबला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सिताफळाच्या बागांना जीवनदान मिळाले आहे.

जूनमध्येच होते आवक
साधारणपणे दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मार्केटयार्डातील फळबाजारात मोठ्या प्रमाणात सिताफळांची आवक होत असते. मात्र, यंदा जुलै सुरू झाला, तरीही अद्याप तुरळक आवक होत आहे.

पावसानेही साथ दिली असती, तर…
व्यापारी युवराज काची यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पहिल्या बहरातील सिताफळांचा हंगाम हा जून ते ऑगस्टदरम्यान राहतो. शहरालगत असलेल्या वडकी, दिवेघाट, उरळी कांचन तसेच थोड्या फार प्रमाणात सातारा जिल्ह्यातून सिताफळे बाजारात दाखल होतात. या काळात सिताफळाच्या दर्जानुसार प्रतिकिलोस जवळपास 80 ते 250 रुपये भाव मिळतो. तो यावर्षी 50 ते 150 रुपये मिळत आहे. दरवर्षी जून ते ऑगस्ट या दरम्यान 10 ते 15 हजार क्रेटस्‌ सिताफळे विक्रीसाठी दाखल होतात. गेल्या वर्षी पावसानेही साथ दिली असती, तर मार्केटयार्डात दररोज 1500 क्रेटस्‌ सिताफळांची आवक झाली असती. मात्र, सध्याच्या घडीला ती 25 क्रेटस्‌ इतकीच होत आहे.

पहिल्या बहराची हुलकावणी
जून ते ऑगस्ट, सप्टेंबर ते ऑक्‍टोंबर आणि नोव्हेंबर ते डिसेंबर अशी तीन बहरांच्या टप्प्यांमध्ये सिताफळे बाजारात दाखल होतात. गेल्या वर्षी कमी झालेला पाऊस तसेच अवकाळी पाऊसही न झाल्याने त्याचा फटका पहिल्या बहरातील सिताफळांना बसला आहे. हंगामाची सुरुवातीच्या काळात आवक कमी असल्याने सिताफळांना चांगला भाव मिळतो.

गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने दमदार आगमन केल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या बहरातून चांगले उत्पादन हाती लागण्याची अपेक्षा आहे. मात्र, यावेळी आवक वाढून सिताफळांना भाव कमी राहतील. तसेच, फळांचा आकार मध्यम आणि लहान स्वरुपाचा राहण्याची शक्‍यता आहे.
– अरविंद मोरे, व्यापारी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.