मुंबई : ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांपैकी फरार केपी गोसावीचा बॉडीगार्ड आणि पंच प्रभाकर साईलने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आपल्याला कोऱ्या पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या करायला लावल्याचेही साईलने सांगितलं. प्रभाकर क्रूजवरील छापेमारीचा साक्षीदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता नवाब मलिक आक्रमक झाले असून त्यांनी समीर वानखेडेंच्या चौकशीची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे.
नवाब मलिक म्हणाले की, एनसीबीच्या पंचाने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करणार आहोत.
याआधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील एक व्हिडीओ शेअर करत सुमोटो दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे पाय आणखी खोलात गेल्याचे दिसून येत आहे.
तत्पूर्वी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींची मागणी झाली. मात्र 18 कोटींवर डील फायनल झाली. त्यापैकी आठ कोटी समीर वानखेडेंना द्यायच ठरलं होतं, असा गौप्यस्फोट प्रभाकर साईल याने केला आहे. प्रभाकरने एक व्हिडीओ शेअर करून या प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम माध्यमांसमोर मांडला आहे.