मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर शाळकरी मुलींच्या अत्याचार प्रकरणी तपासासाठी राज्याच्या गृहखात्याने SIT स्थापन केली आहे. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही SIT स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत.
या प्रकरणात नेमके काय घडले जाणून घेऊयात?
बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपायाकडून अत्याचार करण्यात आला. लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला. १२ ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेले, तर १३ ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला.
या मुली शाळेत जायला तयार नसल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी १२ तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केले. तसेच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी करण्यात येत आहे.