पिंपरी : पिंपरी जवळील देहूरोड येथील घोराडेश्वर डोंगरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथील एका तरुणाने पहाटे डोंगरावर आपल्या वहिनीसोबत फिरायला गेल्यानंतर, तिची निर्घृण हत्या केली आहे.
याप्रकरणी महिलेचा चुलत दीर तुकाराम कोंडीबा धडस (वय २४) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिताली आणि संशयित तुकाराम हे रविवारी (दि. १९) घोराडेश्वर डोंगरावर फिरायला गेले होते. त्यावेळी आरोपीने महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. महिलेने त्यास विरोध केल्याने चिडलेल्या आरोपीने तिचा गळा आवळून खून केला.
तसेच, ओळख पटू नये यासाठी महिलेच्या डोक्यात दगड घालून मृतदेह झुडपात फेकून दिला. दरम्यान, सोमवारी पहाटे पोलिसांना घटनेची माहिती मिळाली, त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला.
गुन्हे शाखेच्या पथकाने महिलेची ओळख पटवून आरोपीला ताब्यात घेतले आहे. तपास तळेगाव दाभाडे पोलिस करीत आहेत.