बीड : राज्याच्या राजकारणात मुंडे बहीण-भाऊ यांच्यातील शाब्दिक चकमक नेहमीच होताना पाहायला मिळते. दरम्यान, पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यात श्रेयवादावरून जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. परळीतील दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याच्या श्रेयवादावरुन आता मुंडे बहिण आणि भावात जुंपल्याचे दिसत आहे.
परळी शहरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरणासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यावरुन या दोघांनीही आपल्यामुळेच हा निधी मिळाल्याचा दावा केला असून गडकरींचे आभार मानले आहेत.
परळीतील श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुल व छ.संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत केंद्र रस्ता व त्यावरील रेल्वे उड्डाणपूल चौपदरीकरण या दोन कामांना आमच्या मागणी प्रमाणे100 कोटी रुपये मंजूर करून आमच्या मतदारसंघातील विकासामध्ये वेळोवेळी निधी दिल्याबद्दल मा.@nitin_gadkari जी यांचे आभार
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 16, 2022
परळी शहरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरण यासाठी शंभर कोटी रूपयाचा निधी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खा. डॉ.प्रितम मुंडे यांच्या मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. याबद्दल पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत गडकरी यांचे आभार मानले आहेत.
श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल चौपदरीकरण व राज्य मार्ग 361 एफ वरील परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत प्रकल्पाचे प्रवेशद्वार या रस्त्याचे व त्यावरील रेल्वे उड्डाण पुलासह चौपदरीकरण करणे ही दोन कामे समाविष्ट करण्यात आली असून यासाठी 100 कोटी रुपये याच आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आले आहेत. या दोन्ही कामांची लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, धनंजय मुंडे यांनी समस्त परळीवासीयांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.