सिस्टर अभया प्रकरणी धर्मगुरू, भिक्षुणी दोषी

थिरुवनंतपुरम – केरळमधील 21 वर्षीय सिस्टर अभया हिच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने कॅथोलिक धर्मगुरू आणि एका भिक्षुणीला दोषी ठरवले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे. सनाल कुमार यांनी या संदर्भातील निकाल आज सुनावला. दोषी आढळलेले धर्मगुरू आणि भिक्षुणींस उद्या (बुधवारी) शिक्षा सुनावली जाणार आहे.

फादर थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी या दोघांवरही सिस्टर अभया हिच्या हत्येचा आरोप सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने सांगितले. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फादर पूथ्राकायाल यांना यापूर्वीच पुराव्या अभावी आरोपमुक्‍त करण्यात आले आहे.

सिस्टर अभया हिचा मृतदेह 1992 साली कोट्टयाम येथील सेंट पियस कॉन्व्हेंटच्या विहीरीमध्ये आढळून आला होता. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल देण्यात आला आहे. आपल्या कन्येला न्याय मिळण्याची वाट बघणाऱ्या अभया यांच्या माता-पित्याचा कही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे.

सिस्टर अभया हिच्या मृत्यूचा तपास सर्वप्रथम स्थानिक पोलिसांकडून आणि नंतर गुन्हे शाखेकडून केला गेला होता. मात्र हे आत्महत्येचे प्रकरण आहे, असा निष्कर्श त्यातून काढला गेला होता. सीबीआयने 2008 साली या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. या प्रकरणाची सुनावणी गेल्या वर्षी 26 ऑगस्ट रोजी सुरू झाली होती. अनेक साक्षीदारांनी साक्ष फिरवली होती.

तीन आरोपींशी संबंधित काही अनैतिक कृत्यांना अभया साक्षीदार होती. त्यामुळेच हिच्यावर कुऱ्हाडीच्या दांड्याने हल्ला करण्यात आला होता, असा दावा सरकारी पक्षाच्यावतीने करण्यात आला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.