मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा मागे घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. मात्र ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. आज अध्यक्ष निवड समितीची वाय. बी. सेंटरमध्ये बैठक होणार असून त्यात शरद पवारांच्या अध्यक्षपदाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत शरद पवार हे अध्यक्षपदावर राहणार आहेत कि नाही हे ठरणार आहे.
मात्र त्यापूर्वी धाराशीवमध्ये एका शेतकऱ्याने चक्क झाडावर चढून सत्याग्रह आंदोलन करत शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावी अशी मागणी केली. बळवंत थिटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नसून शरद पवारांचे समर्थक आहेत. धाराशीव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील ते रहिवासी आहेत. थिटे यांनी शेतातील चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.
राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केवळ घरातील लोकांशी चर्चा करून पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. पक्षातील कोणाशीही चर्चा केली नाही. त्यामुळे पवार यांची ही कृती आमच्या पचनी पडलेली नाही. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता, असं मत बलवंत थिटे यांनी व्यक्त केलं.
सध्या सोशल मीडियावर थिटे यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील थिटे यांनी शरद पवारांसाठी अशा अनोख्या पद्धतीचे आंदोलन केले होते. शरद पवार हे पंतप्रधान व्हावे यासाठी 1993 ते 2014 या काळात त्यांनी आपली दाढी वाढवली होती.