‘साहेब, शिक्षक भरती होणार तरी कधी?’

निवड यादी 5 ऑगस्टपर्यंत जाहीर करा; उमेदवारांचा शासनाला “अल्टिमेटम’

पुणे – पवित्र पोर्टलद्वारे होत असलेल्या शिक्षक भरतीतील उमेदवारांची निवड यादी दि. 5 ऑगस्टपर्यंत जाहीर करा, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक भरतीच्या उमेदवारांनी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला दिला आहे.

राज्यातील 12 हजार शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया वर्षभरापासून सुरू करण्यात आली आहे. 1 लाख 24 हजार उमेदवारांनी भरतीसाठी पोर्टलवर नोंदणी केली. मात्र, यातील 83 हजार 700 उमेदवारांनी शाळांचे प्राधान्यक्रम डाऊनलोड करुन त्यांची नोंदणी पोर्टलवर केली आहे. दरम्यान, एसईबीसीसाठी 16 ऐवजी 13 टक्के आरक्षण नव्याने जाहीर झाले आहे. यामुळे भरती प्रक्रिया लांबण्याची शक्‍यता निर्माण झाल्याचा धोका उमेदवारांच्या लक्षात आला आहे.

या पार्श्‍वभूमीवर शिक्षक भरतीतील उमेदवारांच्या प्रतिनिधी प्राजक्ता गोडसे यांच्या नेतृत्वाखाली काही उमेदवारांनी थेट मुंबई मंत्रालयाकडे मंगळवारी धाव घेतली. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, उपसचिव चारुशीला चौधरी यांची भेट घेऊन उमेदवारांनी त्यांच्याकडे संतप्त भावना मांडल्या आहेत. यावेळी झालेल्या बैठकीस शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, विक्रम काळे, श्रीकांत देशपांडे, बाळाराम पाटील आदी उपस्थित होते. या आमदारांनीही उमेदवारांची बाजू मांडली.

आता कोणत्याची परिस्थितीत भरती प्रक्रिया लांबणीवर टाकू नका. निवड यादी लवकर जाहीर करा. त्याबाबतच्या सूचना पोर्टलवर तत्काळ प्रसिद्ध करा, अशी मागणी उमेदवारांकडून शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

निवड यादी जाहीर करण्यास टाळटाळ झाल्यास उमेदवारांचा संयम राहणार नाही. उमेदवार रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील, असे उमेदवारांनी जाहीर केले आहे, याबरोबरच आंदोलन करण्याचीही तयारी ठेवण्यात येणार आहे, असे प्राजक्ता गोडसे, विठ्ठल सलगर यांनी स्पष्ट केले आहे.

शासन म्हणते…
निवड यादी जाहीर करण्याची अंतर्गत प्रक्रिया सुरू आहे. पोर्टलवर त्याची तपासणीही सुरू आहे. न्यायालयात भरतीबाबत काही याचिका दाखल आहेत. त्यामुळे न्यायालयाची परवानगी घेऊन निवड यादी जाहीर करून उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात येतील. एसईबीसीसाठीचे 3 टक्के पदे गोठविण्याच्या बाबतीय योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन शासन देत असल्याचे उमेदवार सांगत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)