#INDvENG : खेळपट्टीबाबत रडू नका, तंत्र सुधारा

सर व्हिवीयन रिचर्डस यांचे इंग्लंडवर ताशेरे

जमैका -अहमदाबादच्या खेळपट्टीवरून सुरु असलेले रडगाणे थांबवा, सातत्यानेत्यावर टीका करण्यापेक्षा फिरकी गोलंदाजी खेळण्याचे तंत्र सुधारा, अशा शब्दात वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर व्हिवीयन रिचर्डस यांनी इंग्लंडच्या संघावर ताशेरे ओढले आहेत. तसेच जर चौथ्या सामन्यासाठी खेळपट्टी तयार करण्याची माझ्यावर जबाबदारी सोपवली असती तर मी तिसऱ्या सामन्याप्रमाणेच खेळपट्टी तयार केली असती, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

तिसरी कसोटी संपली आता चौथ्या कसोटीत खेळताना इंग्लंड संघातील प्रमुख फलंदाजांनी आपल्या फिरकी गोलंदाजी खेळण्याच्या तंत्रात सुधारणा करणे गरजेचे आहे. केवळ टीका करुन मालिका जिंकता येत नाहीत, त्यासाठी फलंदाजांनाच खेळात सुधारणा घडवावी लागते. खेळपट्टीवरून रडगाणे गात बसण्यापेक्षा इंग्लंडने खेळ सुधारायला हवा. चौथ्या सामन्यात आपल्याला अशाच खेळपट्टीवर खेळावे लागेल अशी मानसिकताही तयार करणे आवश्‍यक आहे, असा टोलाही त्यांनी मारला.

अहमदाबादच्या कसोटी सामन्याबाबत मला अनेकांनी प्रश्‍न विचारले. ज्या खेळपट्टीवर सामना झाला त्यावरुन बरीच टीकाही होत आहे. मात्र, जे टीका करतायेत त्यांना हे समजायला पाहिजे की, की तुम्हाला अनेकदा सीमिंग खेळपट्टी मिळते, गुड लेंथवरुन उसळी घेणारे चेंडू बघितल्यावर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी कठीण असल्याचे सांगितले जाते पण त्यात तथ्य नाही.

अनेकदा फलंदाजांना अशा खेळपट्टीचा सामना करावा लागतो. यालाच कसोटी क्रिकेट म्हणतात. आव्हानात्मक नसेल ती कसोटी ठरणारच नाही. अशाच खेळपट्टीवर फलंदाजाची मानसिकता व तंत्र यांचा कस लागतो. तुम्ही भारतात मालिका खेळत आहात तर, तुम्हाला अशाच खेळपट्टीवर खेळावे लागते. तशी मानसिकता मालिकेपूर्वीच होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

भारत आणि इंग्लंडमध्ये अहमदबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेला तिसरा कसोटी सामना दोनच दिवसांत संपला. भारताने 10 गडी राखून या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 मार्चपासून अहमदाबादमध्येच होणार आहे. या सामन्यासाठी कशी खेळपट्टी असेल यावरही आता चर्चा सुरू झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.