‘साहेब…आमच्या पेशंटची प्रकृती गंभीर आहे, रेमडेसिवीर इंजेक्‍शन द्या ना….’

'रेमडेसिवीर'च्या पुरवठ्यापेक्षा मागणी दुप्पट

केमिस्ट असोसिएशन कार्यालयाबाहेर हजारोंची गर्दी; फक्‍त दीडशे जणांनाच मिळाले इंजेक्‍शन

पुणे – रेमडेसिवीरच्या पुरवठ्यापेक्षा मागणी दुप्पट असून, ते इंजेक्‍शन मिळवण्यासाठी करोना बाधितांच्या नातलगांनी अक्षरश: मेडिकल दुकाने आणि केमिस्ट असोसिएशनच्या कार्यालयाबाहेर हजारोंच्या संख्येने गर्दी केली. अखेर दीडशे जणांनाच ते इंजेक्‍शन पुरवू शकले आहेत.

शहरासह पुणे जिल्ह्यासाठी दररोज औषध उत्पादक कंपन्यांकडून 7 हजार रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, दैनंदिन मागणी ही 14 हजारांच्या आसपास असते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू असून, हे इंजेक्‍शन मिळवण्यासाठी त्यांनी मेडिकलबाहेर रांगा लावल्या आहेत.
मात्र, “रुग्णाला गरज नसताना डॉक्‍टरांनी हे इंजेक्‍शन सुचवू नये,’ असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

करोनाची सौम्य लक्षणे असतानाही आणि गरज नसताना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्‍शन दिले जात असून, त्याचा सर्रास वापर केला जात असल्याचा दावा “अन्न आणि औषध प्रशासना’सह (एफडीए) “केमिस्ट असोसिएशन’कडून केला जात आहे. रुग्णसंख्या वाढल्याने आणि प्रत्येकालाच हे इंजेक्‍शन दिले जात असल्याने या इंजेक्‍शनची मागणी वाढली आणि त्याचा तुटवडा निर्माण झाल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.

ज्या करोनाबाधिताच्या फुफ्फुसाला संसर्ग झालेला असतो. त्याच्या “सीटी स्कॅन’चा स्कोअर 25 पैकी 11 च्या पुढे आहे, त्यांना रेमडेसिवीर इंजेक्‍शन देण्याची आवश्‍यकता असते. सुरुवातीला हे औषध वापरण्याची परवानगी ही काहीच मोठ्या रुग्णालयांना होती. मात्र, रुग्णसंख्या कमी झाली आणि महापालिकेने हे औषध वापरण्याची परवानगी छोट्या खासगी रुग्णालयांनाही दिली. त्यामुळे रुग्णांची तब्येत स्थिर असली किंवा त्याचा “सीटी स्कोअर’ 5 च्या आत असला तरीही बाधित रुग्णाला हे इंजेक्‍शन दिले जाते. आणि ते आणण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना पिटाळले जात आहे.

बाधितांची संख्या वाढल्याने आता या इंजेक्‍शनची मागणीही दुपटी-तिपटीने वाढल्याचे “एफडीए’तील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. चार दिवसांपूर्वी हे इंजेक्‍शन सहज बाजारात उपलब्ध होत होते. मात्र, आता याची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे, असा आरोप एका मेडिकल व्यावसायिकांनी केला आहे.

तासन्‌तास रांगा
रेमडेसिवीर घेण्यासाठी केमिस्ट असोसिएशनच्या कार्यालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली. आज ज्यांना मिळाले नाही, परंतु जे तासन्‌तास रांगेत उभे होते, त्यांना दुसऱ्या दिवशीचे टोकन दिले जात होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी इंजेक्‍शन मिळेल याची खात्री अनेकांना होती. एकावेळी सुमारे दोनच इंजेक्‍शन दिले जात होते.

“आयएमए’कडून डॉक्‍टरांची पाठराखण
रुग्णांची संख्या वाढल्याने रेमडेसिवीर इंजेक्‍शनची मागणी वाढली आहे. जो रुग्ण गंभीर असतो किंवा ज्याचा फुफ्फुसाचा सीटी स्कोअर 10 च्या पुढे असतो त्यांनाच इंजेक्‍शन वापरण्यात येते, असे सांगत “इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या पुण्याच्या अध्यक्ष डॉ. आरती निमकर यांनी डॉक्‍टर आणि हॉस्पिटलची पाठराखण केली आहे. डॉक्‍टरांकडून सर्रासपणे वापर केला जातो असे नाही. वास्तविक नागरिकांनी आता नियम पाळणे गरजेचे आहे, असा सल्लाही
डॉ. निमकर यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.