साहेब, आमची जमीनच वाहून गेली, संसार पाण्यात गेला; मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्याला अश्रू अनावर

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद येथील धाराशिव जिल्ह्यातील काटगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल अशा मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री तुळजापूरमध्ये काटगाव येथे पाहणी करण्यासाठी पोहोचले असता शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. साहेब, आमची जमीनच वाहून गेली, संसार पाण्यात गेला असे म्हणत एक शेतकरी मुख्यमंत्र्यासमोर रडला. मुख्यमंत्र्यांनी  या शेतकऱ्याला धीर देत संपूर्ण संसार उभा करून देण्याचे आश्वासन दिले. 

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले कि, आजची परिस्थिती भयानक आहे. वर्षाची सुरुवातच जागतिक संकटाने झाली आहे. बाहेर पडू म्हणताच निसर्ग वादळ आले आणि जाता जाता पावसाने तडाखा दिला. जवळपास ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. लवकरात लवकर आयुष्य पुन्हा उभे करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे

सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणाऱ्यातला मी नाही. जे बोलतो ते मी करतो, पण करू शकत नाही असे बोलत नाही. तुम्ही सर्वजण मला ओळखता. तुम्हाला बरे वाटावे, टाळ्या वाजवाव्यात यासाठी आकडा जाहीर करणार नाही. मी दिलासा देण्यासाठी आलो आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.