साहेब. स्कॉर्पिओ मूळ मालकालाच द्या

चोरट्यांच्या अनोख्या संदेशामुळे पोलीसही चक्रावले

शिक्रापूर (पुणे) – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी चोरलेली स्कॉर्पिओ गाडी अहमदनगर जिल्ह्यात आढळली आहे. नगर पोलिसांना गस्त घालताना ही गाडी आढळल्यानंतर चोरट्यांनी चक्‍क या स्कॉर्पिओमध्ये मोठ्या कागदावर ही गाडी कोरेगाव भीमा येथून चोरलेली असून मूळ मालकाला परत मिळावी, असा संदेश गाडीमध्ये लिहून ठेवल्याने पोलीस प्रशासनदेखील अवाक्‌ झाले. मात्र, चोरट्याने जाता जाता एक मोठा पार्ट लांबविला आहे. चोरट्याच्या नामी युक्‍तीची परिसरात चर्चा सुरू आहे.

कोरेगाव भीमा येथील विजय गव्हाणे यांच्या स्कॉर्पिओचे चालक गणेश जाधव हे (दि.6) रात्री ही गाडी (एमएच 12 एसएफ 1887) सत्यनारायण क्‍लॉथ सेंटरजवळील मोकळ्या जागेत पार्क करून गेले होते. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी ही गाडी पळविली. याबाबत चालक गणेश जाधव (रा. कोरेगाव भीमा) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. गुरुवारी (दि. 8) अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस रात्रगस्त घालत होते. त्यावेळी त्यांना रस्त्याच्याकडेला ही गाडी संशयितरित्या आढळली. यावेळी पोलिसांनी स्कॉर्पिओजवळ जात दरवाजा उघडला. त्यावेळी गाडीत एक मोठा कागद दिसला. त्या कागदावर ही गाडी कोरेगाव भीमा, पुणे येथून चोरली आहे. ती मूळ मालकाला परत मिळावी, असा फलक लिहिलेला दिसला. अहमदनगर पोलिसांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून चौकशी केली. त्यावरून ती गाडी कोरेगाव भीमा येथून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.

शिक्रापूर स्टेशनचे पोलीस नाईक योगेश नागरगोजे, संतोष शिंदे यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे पाहणी केली असता स्कॉर्पिओमधील एक मोठा पार्ट चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. मात्र, इतक्‍या महागड्या गाडीची चोरी करूनदेखील चोरट्यांनी पोलिसांना संदेश दिल्याने पोलीस प्रशासन देखील चक्रावून गेले आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील स्कॉर्पिओ ताब्यात घेतली. अधिक पोलीस हवालदार सचिन मोरे करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.