मुंबई: वांद्रे फॅमिली कोर्टाने करुणा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी महिन्याला पोटगीपोटी २ लाख रुपये देण्याचे आदेश दिले. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा करुण मुंडे (शर्मा) यांचा दावा आहे. फॅमिली कोर्टाच्या आदेशानंतर करुणा शर्मा नको, मला करुणा मुंडे म्हणा तो माझा अधिकार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. करुणा शर्मा यांनी सोशल मीडियाद्वारे आपले म्हणणे मांडत धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले. त्यामुळे धनंजय मुंडे हे अडचणीत आले आहेत. आता करुणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
मी देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खूप-खूप आभार मानते. आज परळी, बीडमध्ये जे चांगले एसपी साहेब पाठवले, त्यांचं खूप चांगलं काम चालू आहे. जे परळीत गुंड आहेत, त्यांना उचलून जेलमध्ये टाकण्याच जे काम सुरु आहे, त्याच्यासाठी मी फडणवीस साहेबांचे खूप-खूप आभार मानते, असे म्हणत करुणा यांनी फडणवीस यांचे आभार मानले. तसेच त्या पुढे म्हणाल्या, फडणवीस साहेब मी तुम्हाला लवकरच पुराव्यांसह भेटणार. एक बहिण म्हणून मला न्याय द्या, अशी विनंती त्यांनी फडणवीसांकडे केली आहे. यामुळे आता करुणा शर्मा फडवीसांना भेटून कोणते पुरावे सादर करून खळबळ उडवणार असल्याची चर्चा केली जात आहे.
कोण आहेत करुणा मुंडे (शर्मा) ?
करणा मुंडे (शर्मा) या मूळच्या मध्य प्रदेशातील इंदूर इथल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या मुंबईत राहतात. करुणा शर्मा यांच्या फेसबुक अकाऊंटवर त्यांनी आपलं नाव करुणा धनंजय मुंडे असेल लिहिलं आहे. मुंबईतील जीवनज्योत या सामाजिक सेवा संस्थेशी संबंधित असल्याचं त्यांनी फेसबुक अकाऊंटवर लिहिलं असून काही सामजिक कार्य केल्याचे फोटो देखील शेअर केले आहेत.