विशाल भालेराव
खडकवासला – सिंहगडाच्या कल्याण दरवाजा जवळ तटबंदीच्या खालच्या भागातील कल्याण गावाकडे जाणाऱ्या पायवाटेवर कोसळलेल्या दरडीखाली सापडलेल्या एका ट्रेकरचा मृत्यू झाला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे सदस्य तानाजी भोसले आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह दरडीखालून रात्री साडेअकरा वाजता बाहेर काढला. सायंकाळी पाच वाजता तो बेपत्ता असल्याची वार्ता सिंहगड परीसरात पसरली होती.
हेमांग धीरज गाला ( वय ३१, रा. ७९३, श्रीमान सोसायटी, भांडारकर रोड, पुणे) असे त्याचे नाव आहे. तो राज्यस्तरीय फुटबॉल पट्टू आणि पट्टीचा ट्रॅकर होता. काल वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन या संस्थेच्या वतीने सिंहगड परिसरात एपिक ट्रेल मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातून ३०० स्पर्धक सहभागी झाले होते. हेमांग २२ किलोमीटरच्या स्पर्धेत सहभागी झाला होता. सिंहगड पायथ्याच्या आतकरवाडी येथून या स्पर्धेला सुरुवात झाली होती.
आतकर वाडीतून कोंढणपूर मार्गे कल्याण दरवाजातून गडावर येऊन पुन्हा आतकरवाडी असा या स्पर्धेचा मार्ग ठेवण्यात आला होता. ठीकठिकाणी स्वयंसेवकही मार्ग दाखवण्यासाठी होते. कल्याण दरवाजातही असलेल्या स्वयंसेवकांनी दरड पडल्याचा आवाज आल्याचे त्यांनी सांगितले. तिथे कोणताही ट्रेकर, पर्यटक किंवा स्थानिक ग्रामस्थ नसल्याचे त्यांनी खात्री केल्याचेही कळवण्यात आल होते.
त्यानंतर सायंकाळी स्पर्धेचे आयोजकांना हेमांगच्या कुटुंबीयाकडून तो अजून आला नसल्याचे कळवण्यात आल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली. त्याने घरी स्पर्धेसाठी सिंहगडावर जात असल्याचे सांगितले असल्याने त्याचे वडील त्याला पाहण्यासाठी सिंहगड पायथ्याला आले त्यांना त्याची गाडी तेथेच दिसली त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनला तो बेपत्ता असल्याचे खबर दिली.
आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे सदस्य तानाजी भोसले आणि त्यांचे सहकारी, सिंहगड घेराचे उपसरपंच अमोल पढेर, पीएमआरडीएच्या जवानांसह सुजित पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध घेतला. पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष तोडकर करत आहे.
हेमांग गाला राष्ट्रीय गिर्यारोहक आणि राज्यस्तरीय फुटबॉलपट्टू होता. त्याने हिमालयातील अनेक ट्रेक केले आहेत. या स्पर्धेमध्ये ही तो अनेक वर्षांपासून सहभागी होत होता गेल्यावर्षी तो दुसरा आला होता. या वर्षी तो पहिला येण्याच्या अपेक्षेने स्पर्धेत उतरला होता.
– मारूती गोळे, ट्रेकर
नुकतीच पावसाला सुरवात झाल्याने गेल्या तीन चार दिवसापासून सिंहगडावर कधी जोरदार तर कधी रिमझिम पाऊस असतो. कल्याण दरवाज्याजवळचा कोसळलेला कडा तीव्र उताराचा आहे. उन्हाळ्यात झालेली धूप आणि आता आलेला पाउस यामुळे झीज होउन कडा कोसळला.
– ज्ञानेश्वर कोडीतकर, अध्यक्ष सिंहगड अभिनव संस्था