पुणे – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अखेरीस निकाली निघत आहे. या रस्त्यावर राजारामपूल ते वडगाव येथील फनटाइम सिमेनागृहापर्यंत महापालिका उड्डाणपूल उभारणार आहे. या प्रकल्पाला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली आहे. या कामासाठी सुमारे 118 कोटी 67 लाख रुपयांचा खर्च येणार असून पुढील चार वर्षांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
गेल्या दशकभरात सिंहगड रस्ता परिसरात नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढल्याने तसेच धायरीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. अखेर या पुलामुळे ही कोंडी सुटणार आहे. आमदार माधुरी मिसाळ आणि स्थानिक नगरसेवक मंजुषा नागपुरे यांनी या पुलासाठी वारंवार पाठपुरावा केला होता.
रासने म्हणाले, “या रस्त्यावर उड्डाणपुलासाठी 2019-20 या आर्थिक वर्षात 10 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानंतर सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती. सल्लागारांनी उड्डाणपूल बांधण्याचे चार पर्याय सुचवले होते. त्यापैकी राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. तर 2020-21 मध्ये उड्डाणपुलासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. तिला अल्प प्रतिसाद मिळाला होता. या पुलासाठी लागणारी 135 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करायला स्थायी समितीने मंजुरी दिली होती. ही रक्कम टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे.’
स्वारगेटकडे जाण्यासाठी – राजाराम पूल चौकात 495 मीटर लांबीचा पूल
सिंहगडकडे जाण्यासाठी – राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत 2021 मीटर लांबीचा पूल
दुहेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी 16.3 मीटर
एकेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी – 8.5 मीटर
मेट्रो मार्गिकेचा विचार करून आवश्यक जागा सोडणार आहे.
2.47 – किलो-मीटरची वाहतूक थेट होणार आहे.
वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.