पुणे – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल आणि विठ्ठलवाडी ते फनटाइमपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. यासाठी 18 टक्के अधिक दराने निविदा आल्याने पालिका प्रशासनाने त्या रद्द केल्या आहेत.
दरम्यान, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा पूल आवश्यक असल्याने त्याची फेरनिविदा तातडीने राबविण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी केली आहे. या शिवाय, या रस्त्याला पर्यायी असलेल्या इतर दोन रस्त्यांबाबतही निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
या उड्डाणपुलासाठी 30 कोटींची तरतूद आहे. निविदा मागवल्यानंतर 2 कंपन्या आल्या असून, त्यातील सर्वांत कमी असलेली निविदा 18 टक्के जादा दराची आहे. त्यामुळे ती रद्द करण्यात आली आहे. परिणामी, पुन्हा निविदा मागवण्यात आल्यानंतर उशीर होऊन या वर्षीची तरतूद वाया जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने फेरनिविदा मागवून 31 मार्चपूर्वी काम सुरू करावे, अशी मागणी नागपुरे यांनी केली आहे.
रस्त्याचे कामही रखडले
सिंहगड रस्ता पुलाच्या निविदेशिवाय इंडियन ह्यूम पाइप ते सनसिटी आणि पुढे दुधाने लॉन्स या रस्त्यांचे कामही अजूनही सुरू झालेले नाही. ते लवकर मार्गी लागल्यास कर्वेनगरहून वडगावमध्ये जाण्यासाठी स्वतंत्र पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. तसेच सिंहगड मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यासाठी पु.ल. देशपांडे उद्यान ते फनटाइमपर्यंतच्या रस्त्याचे कामही थांबलेले आहे. ते सुरू करावे, अशी मागणी नागपुरे यांनी केली आहे.