पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शहराजवळ असणारा सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी काही दिवसांपूरता बंद करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
पुणे शहर आणि परिसरात करोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. ही संख्या वाढत आहे. हा विषाणू संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शिवाय, काही शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांचे आकर्षण असणारा सिंहगड किल्ला शनिवार व रविवारी बंद ठेवण्यात यावा.
सुट्टीच्या काळात सिंहगडावर 15 ते 20 हजाराहून अधिक पर्यटक येत असतात. ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होणे म्हणजे करोना सारख्या विषाणूला आमंत्रण देण्यासारखे होईल. त्यामुळे त्याचा धोका कमी होईपर्यंत किल्ला सिंहगड बंद ठेवावा. शिवसेनेचे खडकवासला शाखाप्रमुख महेश पोकळे यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि वन विभागाला दिले आहे.