Singer Manjit Singh Ral : मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्रिटिश-भारतीय सिंगर आणि आरडीबी बँडचे माजी मुख्य गायक मंज म्यूजिक या नावाने ओळखला जाणारा मनजीत सिंह राल (Singer Manjit Singh Ral) याचा लंडनमध्ये गंभीर अपघात झाला आहे. अपघातानंतर त्यांना तात्काळ लंडनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मनजीत सिंह राल हे झी सिने अवॉर्ड्स २०२६मध्ये मुंबईत एक दमदार परफॉर्मन्स सादर करण्यासाठी येत होते. ते ‘स्वॅग मेरा देसी’ आणि ‘लाल घागरा’ सारख्या हिट गाण्यांसह भांगडा आणि अर्बन हिप-हॉप स्टाइलमध्ये स्टेज जिंकणार होते. मात्र, भारत दौरा करण्यापूर्वीच लंडनमध्ये हा अपघात झाल्याने त्यांना आपला दौरा आणि परफॉर्मन्स रद्द करावा लागला आहे. ही अपघाताची घटना लंडनच्या रस्त्यावर घडली. अपघाताची नेमकी तपशीलवार माहिती अद्याप समोर आलेली नाही, तसेच त्यांच्या दुखापतींची तीव्रता आणि प्रकार याबाबतही अधिकृत माहिती उघड करण्यात आलेली नाही. त्यांच्या टीमने फक्त इतकेच सांगितले आहे की, ते रुग्णालयात उपचार घेत असून, भारतातील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मनजीत सिंह राल यांचा संगीत प्रवास मनजीत सिंह राल यांचा जन्म ब्रॅडफोर्ड (यूके) येथे झाला. त्यांनी २००० च्या दशकाच्या सुरुवातीला भाऊ कुलदीप राल (कुली राल) आणि सुरजीत सिंह यांच्यासोबत आरडीबी बँडची स्थापना केली. सुरुवातीला ते स्थानिक गुरुद्वारांमध्ये परफॉर्म करत होते, नंतर त्यांनी देसी बीट्स, ढोल आणि बेस यांचे बॉलिवूड व आंतरराष्ट्रीय संगीताशी मिश्रण करून एक वेगळी ओळख निर्माण केली. स्नूप डॉग, टी-पेन, लुडाक्रिस यांसारख्या जागतिक स्टार्ससोबत सहकार्य करून आरडीबीने ‘देसी कूल’ स्टाइल लोकप्रिय केली. २०१२ मध्ये बँडला मोठा धक्का बसला, जेव्हा कुली राल यांचे निधन झाले. त्यानंतर २०१४ मध्ये मनजीत सिंह रालने सोलो करिअर सुरू केले आणि ‘स्वॅग मेरा देसी’, ‘लाल घागरा’, ‘ओम मंगलम’ सारख्या गाण्यांनी लाखो चाहत्यांचे मन जिंकले. सध्या त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर प्रार्थना आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ते लवकर बरे होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.