वॉशिंग्टन – प्रख्यात गायक आणि अभिनेता मिट लोफ उपाख्य मार्विन ली ऍडे यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांचा बॅट आऊट ऑफ हेल या अल्बममुळे जगभरातील चाहत्यांच्या मनात त्यांनी घर केले होते. द रॉकी हॉरर पिक्चर शो आणि फ्लाईट क्लब यामधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या ते 74 वर्षांचे होते.
आपल्या सर्वांना प्रेरणादायी असणाऱ्या आणि एक सुंदर माणसाला गमावल्यानंतर आम्ही शोकसागरात असताना आपण दाखवलेल्या प्रेमाचा आणि पाठिंब्याचा आम्ही कृतज्ञतापूर्वक स्वीकार करत आहोत, असे निवेदन मिट लोफ यांच्या कुटुंबियांनी जारी केले. तुमच्या हृदयापासून त्याच्या आत्म्यापर्यंत साऱ्यांना त्याने हलवून ठेवले होते, असेही त्यांनी नमूद केले आहे.
ग्रॅमी पुरस्कार विजेत्या मार्विन ली ऍडे यांचे गुरूवारी निधन झाले. त्यावेळी कुटुंबीय त्यांच्यासह होते. या गायकाची कन्या पर्ल आणि अमांडा आणि काही जिवलग मित्र त्यांच्या सोबत अखेरचे 24 तास होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आले नाही, असे त्यांच्या सोबत दीर्घकाळापासून कार्यरत असणाऱ्या सहकाऱ्याने सांगितले.
त्यांचे सुमारे 10 कोटी अल्बम विकले होते. बॅट आऊट ऑफ हेल या अल्बमच्या सुमारे एक कोटी 40 लाखापेक्षा अधिक प्रती खपल्या होत्या. जगात सर्वकालीन सर्वाधिक विकलेल्या 10 अल्बममध्ये याचा समावेश आहे. आय हॅड डू एनिथिंग फॉर हे गाणे सर्वाधिक लोकप्रिय ठरले होते.