सिंगापूर : संसदेत शपथेवर खोटे बोलल्याच्या दोन आरोपांमध्ये सिंगापूरमधील भारतीय वंशाचे विरोधी नेते प्रीतम सिंग यांना स्थानिक जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सिंग यांना संसदीय समितीसमोर खोटे बोलल्याच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले आहे. प्रत्येक आरोपासाठी ७ हजार सिंगापूर डॉलर असा एकूण १४ हजार डॉलरचा दंडही सिंग यांना ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने दोषी ठरवले असले, तरी या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक आपण लढवणार असल्याचे सिंग यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सिंगापूरच्या राज्यघटनेनुसार एखाद्या संसद सदस्याला किमान एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली किंवा किमान १० हजार सिंगापूर डॉलर इतका दंड ठोठावला गेला, तर त्या संसद सदस्याचे संसद सदस्यत्व रद्द होते आणि संबंधित नेता निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरतो.
मात्र सिंग यांना झालेली शिक्षा त्यांना अपात्र ठरवण्याइतकी नसल्याचे निवडणूक विभागाने समोवारी स्पष्ट केले. अपात्रतेचा निर्णय सिंग यांना झालेल्या शिक्षेवर आधारलेला असल्याचे विभागाने म्हटले आहे. न्यायालयाच्या लेखी निकालाचा सविस्तर अभ्यास करून त्याविरोधात अपील करण्याची सूचना आपण आपल्या वकिलांना केली असल्याचे सिंग यांनी फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय आहे प्रकरण…
सिंग यांच्याच वर्कर्स पार्टीचे माजी ससंद सदस्य रायसेह खान यांच्याशी संबंधित २०२१ मधील संसदेत खोटे बोलण्याच्या प्रकरणावर सिंग देखील खोटे बोलल्याचे दोन आरोप त्यांच्यावर होते. लैंगिक अत्याचार पीडितेला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याबद्दलची कथा रचल्याचे खान यांनी कबूल केले होते. खान यांच्या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सिंग यांनी १० डिसेंबर आणि १५ डिसेंबर २०२१ रोजी संसदीय समितीला जाणूनबुजून दोन खोटी उत्तरे दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. सिंग हे विरोधी वर्कर्स पार्टीचे सरचिटणीस आहेत आणि सोमवारी त्यांना दोषी ठरवण्यात आले.