सिंगापूर -गतविजेती पुसर्ला वेंकट अर्थात पी. व्ही. सिंधू आणि पूर्णपणे बहरामध्ये असलेला एचएस प्रणॉय येथे सुरू होणाऱ्या सिंगापूर ओपन सुपर 750 स्पर्धेत भारतीय आव्हानाचे प्रतिनिधित्व करतील. यावर्षीच्या स्पर्धेतही भारतीय आपले वर्चस्व काय राखतील अशी आशा करण्यात येत आहे. प्रियांशू राजावत, लक्ष्य सेन, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत, चिराग शेट्टी, सात्विकसाईराज रॅंकीरेड्डी, एमआर अर्जुन, ध्रुव कपिला, ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद असे इतर भारतीय शटलर या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावतील.
गेल्या ऑगस्टमध्ये घोट्याला दुखापत झाल्यापासून सिंधूसाठी परिस्थिती पूर्वीसारखी नाही. माद्रिद स्पेन मास्टर्स आणि मलेशिया मास्टर्समध्ये अनुक्रमे अंतिम आणि उपांत्य फेरीसह ती हळूहळू तिच्या सर्वोत्तम कामगिरीकडे परत येत आहे. तथापि, थायलंड ओपनच्या पहिल्या फेरीत कॅनडाच्या मिशेल ली हिला हरवल्यानंतर सिंधू बाहेर पडली होती. आता सिंधूचा सामना जागतिक क्रमवारीत क्रमांक एकवर असलेल्या जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे.
यापूर्वी सिंधूने यामागुचीविरुद्ध 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवला आहे. परंतु गेल्या वर्षी थायलंडमध्ये दोघांचा सामना झाल्यापासून बरेच काही बदलले आहे. दुसरीकडे, प्रणॉय, सहा वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवून, मलेशिया मास्टर्समध्ये पहिला बीडब्ल्युएफ मुकुट जिंकून स्पर्धेत उतरत आहे. मनोबल वाढवणाऱ्या या विजयाने प्रणॉयची विजयाची भूक नक्कीच वाढली असेल. या क्षणी प्रणॉय हाच भारताचा सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा एकेरीचा खेळाडू आहे. त्याची सलामीची लढत जपानच्या तिसऱ्या मानांकित कोडाई नाराओकाविरुद्ध असेल.
2021 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेत्या किदाम्बी श्रीकांतची त्याच्या सुरुवातीच्या फेरीत थायलंडच्या कांताफोन वांगचारोएनशी गाठ पडेल, तर ऑर्लीन्स मास्टर्स विजेती प्रियांशू राजावतची गाठ जपानच्या कांता त्सुनेयामाशी पडेल. महिला एकेरीत, लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना नेहवाल थायलंडच्या रत्चानोक इंतानोनशी खेळेल.
पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेले, गतवर्षीचे फ्रेंच ओपन सुपरचे विजेते चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रॅंकीरेड्डी, जपानच्या अकिरा कोगा आणि ताइची सायटोविरुद्ध सलामी देतील, तर एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांचा सामना फ्रान्सच्या लुकास कॉर्व्ही आणि त्याच्या जोडीशी होईल.