दुसऱ्या फेरीतच सिंधूचे आव्हान संपुष्टात

चीन खुली बॅडमिटन स्पर्धा
चांगझुओ: विश्‍वविजेत्या पी.व्ही.सिंधू या भारतीय खेळाडूला चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतच धक्‍कादायक पराभवास सामोरे जावे लागले. थायलंडच्या पोर्नीपावी चोचुवांग हिने तिचा 12-21, 21-13, 21-19 असा रोमहर्षक लढतीनंतर पराभव केला. सात्विकसाईराज रान्किरेड्डी याला पुरूष दुहेरी व मिश्रदुहेरी या दोन्ही गटातही हार मानावी लागली.

सात्विक व चिराग शेट्टी यांना जपानच्या ताकेशी कामुरा व केईगो सोनोदा यांच्याकडून 19-21, 8-21 असा पराभव झाला. मिश्रदुहेरीत जपानच्याच युकी कानेको व मिसाकी मत्सुमोतो यांनी सात्विक व अश्‍विनी पोनप्पा यांच्यावर 21-11, 16-21, 21-12 असा विजय मिळविला.

सिंधूने यापूर्वी चोचुवांगविरूद्ध झालेल्या तीनही लढती जिंकल्या होत्या. साहजिकच येथेही तिचेच पारडे जड होते. त्यातच तिने नुकतीच जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धाही जिंकली होती. चोचुवांगविरूद्ध येथील लढतीमधील पहिल्या गेममध्ये 7-1 अशी आघाडी मिळविली होती. मात्र तिने केलेल्या चुकांचा फायदा घेत चोचुवांगने ही आघाडी 10-11 अशी कमी केली. सिंधूने पुन्हा आक्रमक खेळ करीत सलग 8 गुणांची कमाई केली. खेळावरील नियंत्रण कायम ठेवीत तिने ही गेम घेतली.

दुसऱ्या गेममध्ये चोचुवांगने 5-1 अशी आघाडी मिळविली. सिंधूने ही आघाडी कमी केली. तथापि चोचुवांगने स्मॅशिंगचे जोरकस फटके व प्लेसिंग असा खेळ करीत 15-7 अशी आघाडी मिळविली. आघाडी कायम ठेवीत तिने ही गेम घेतली आणि सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे तिसऱ्या गेमबाबत उत्कंठा निर्माण झाली. या गेममध्ये 6-6 अशा बरोबरीनंतर सिंधूने 11-7 अशी आघाडीही मिळविली होती. तथापि तिच्याकडून झालेल्या अक्षम्य चुका चोचुवांगच्या पथ्यावर पडल्या. चोचुवांगने हळुहळु पिछाडी भरून काढली. तिने सलग सहा गुण मिळवित ही गेम घेतली आणि विजयावरही शिक्‍कामोर्तब केले.

Leave A Reply

Your email address will not be published.