सिंधुदुर्ग : शिवसेनाच वरचढ

– विदुला देशपांडे 

कोकण खरे तर नारायण राणेंचे होमपीच. इथे राणेंना आव्हान देणारा कुणी नाही अशीच आतापर्यंत समजूत होती. कोकणात शिवसेनेचा दबदबा राणेंमुळे होता असे सगळ्यांनाच वाटत असे. म्हणूनच जेव्हा राणे शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये गेले तेव्हा कोकणात शिवसेनेचे अस्तित्वच संपते की काय अशी शंका वाटू लागली होती. पण राणेंनाच नाही म्हटले तरी कॉंग्रेसमध्ये गेल्याचा निर्णय अंगलट आला. कारण कोकणात त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्‍का बसला. भलेही त्यांच्यामुळे कॉंग्रेसला कोकणात जरा तरतरी आली, पण ती क्षणिकच ठरली. नारायण राणेंशिवायही शिवसेनेने कोकणावरील आपली पकड सोडली नाही. आताही सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे पारडे जड आहे.

आता लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर होईपर्यंत राजकीय गरमागरमी चालूच राहणार. त्याच वातावरणात प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील रणनीती आणि पक्षांचे बलाबल मतदारही तोलून पाहात आहेत. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मात्र शिवसेनेचीच पताका फडकत राहील असे दिसत आहे. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचा वरचष्मा आहे तर केवळ एका मतदारसंघात कॉंग्रेसचे आमदार आहेत. पाहायला गेले तर कोकणात कुठेच शिवसेनेला राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सोडला तर कुणाचेच आव्हान नाही. भाजपची ताकद फारशी नसल्याने शिवसेनेला त्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. पण तिथेच खरी गोम आहे. कोकणात शिवसेनेला बाहेरील पक्षांचे नाही खुद्द भाजपचेच आव्हान आहे. कारण येथील स्थानिक भाजप नेत्यांनी शिवसेनेला सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे करत आहेत. या लोकसभा निवडणुकीतही त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे.

खासदार विनायक राऊत यांनीही तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. पण त्यांच्याविषयी भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आहे. कोकणातील नाणार अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेना आणि राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा विरोध असल्याने भाजप नेत्यांची शिवसेनेबाबत नाराजी आहे. या निवडणुकीत राऊतांचा प्रचार न करण्याचा निर्णय सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आणि रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी घेतला आहे आणि त्यांच्या निर्णयाला दोन्ही जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचेही समर्थन आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युती झाली तरी कोकणात युतीधर्म पाळायला भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते तयार नाहीत. आणि या दोन पक्षांतील या मतभेदांचा फायदा राणेंना होणार हे स्पष्ट आहे. ही सगळी परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माहीत आहे. त्यामुळे आता ते या नेत्यांना आणि कार्यक़र्त्यांना काय सूचना देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेनेही भाजप आणि शिवसेनेतील वाद संपुष्टात यावा यासाठी कंबर कसली आहे. आमदार प्रसाद लाड हे मतभेद कमी करून भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात भाजपत शिवसेनेबद्दल कितीही नाराजी असली तरी निवडणूक प्रचारात हे दोन्ही पक्ष बरोबरीने काम करतील. आणि त्यांच्यात परस्परांविषयी कितीही नाराजी असली तरी सत्तेच्या राजकारणात ते आपल्या भांडणाचा वापर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला करून देणार नाहीत हे नक्‍की.

सध्या देशात आणि राज्यातही भाजपला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे त्यात काहीही बदल होईल असे वर्तन भाजपचे वरिष्ठ नेते पक्षातील कुणालाच करू देणार नाहीत. कोकणातही हेच घडणार आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेत मतभेद असले तरी प्रचार जसा रंगात येईल तसे हे मतभेदही विरून जातील.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी, राजापूर-लांजा, चिपळूण-संगमेश्‍वर, कणकवली, मालवण-कुडाळ आणि सावंतवाडी हे विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील कणकवली वगळता सर्व ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. कणकवलीला कॉंग्रेसचे नितेश राणे आमदार आहेत. पण ते नावालाच कॉंग्रेसचे आहेत. त्यांच्या निष्ठा तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशी जोडलेल्या आहेत.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. या मतदारसंघातील दहा जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच आहे. भाजपचे सामर्थ्य रत्नागिरी शहर आणि काही गावांपुरतेच मर्यादित आहे. शहरी भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचेही अस्तित्व जाणवते. मात्र इथे शिवसेनेलाच पोषक वातावरण आहे. इथले आमदार उदय सामंत यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. भाजप मात्र प्रचारापासून अजून दूरच आहे. याचा फायदा राणेंना होऊ शकतो. पण सध्या तरी शिवसेनेतच प्रचाराची रणधुमाळी माजली आहे. कॉंग्रेस, स्वाभिमान निवांतच आहेत.

चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इथे राष्ट्रवादी कॉंग्रेसही हालचाल करत आहे. स्वाभिमानला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. स्वाभिमाननेही मरगळ झटकून प्रचाराला सुरुवात केली आहे.

राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेचेच वर्चस्व आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत लांजा तालुक्‍याचे महत्त्व वाढले होते. लांजा नगरपंचायत आणि आजूबाजूच्या परिसरात भाजपचा प्रभाव वाढू लागला आहे. नाणार प्रकल्प रद्द झाल्याचे श्रेय घेऊन शिवसेना आपले मतदार राखण्याचा प्रयत्न करत आहे. पण शिवसेना आणि भाजपतील मतभेद इथेही आहेत.

कणकवली हा विधानसभा मतदारसंघ म्हणजे नारायण राणेंचा बालेकिल्ला आहे. इथे त्यांचे पुत्र नितेश राणे हेच आमदार आहेत. या मतदारसंघात नितेश राणे यांनी युवक कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी तयार केली आहे. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानला होणार आहे. कणकवली आणि वैभववाडीत स्वाभिमानला पोषक वातावरण आहे तर देवगड तालुक्‍यात शिवसेना मजबूत आहे. भाजपचाही इथे चंचूप्रवेश झालेला आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे वर्चस्व आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विनायक राऊत यांच्या मागे आपली ताकद लावली होती. सावंतवाडीतून राऊत यांना सर्वाधिक मताधिक्‍य मिळवून दिले. नंतर विधानसभा निवडणूकही त्यांनी एकहाती जिंकली. पण नंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वाभिमानने मुसंडी मारली. आता स्वाभिमानचे आव्हान केसरकरांना जाणवत आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघात संमिश्र वातावरण आहे. इथे शिवसेना आणि स्वाभिमान या दोन्ही पक्षांचे बळ सारखेच आहे. इथे शिवसेनेला आपले मताधिक्‍य टिकवण्याचे आणि स्वाभिमानला आपले पाय आणखी मजबुतीने रोवण्याचे आव्हान आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.