सिंधू : एक सुवर्ण आशा

भारतामध्ये सर्वाधिक पाहिला जाणारा क्रीडाप्रकार म्हणजे क्रिकेट होय. मात्र, क्रिकेटला बगल देत दुसरेही क्रीडा प्रकार महत्त्वपूर्ण आहेत. या इतर प्रकारच्या क्रीडा प्रकारातूनही देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविले जाऊ शकते. या प्रकारचा विश्‍वास देशवासियांमध्ये निर्माण करणारे असंख्य खेळाडू आपल्या देशामध्ये आहेत. यातीलच एक जगप्रसिद्ध नाव म्हणजे पुसारला वेंकटा सिंधू उर्फ पी.व्ही. सिंधू होय.

सिंधूचा जन्म 5 जुलै 1995 रोजी हैदराबाद येथे झाला. आई-वडील दोघेही व्हॉलीबॉल खेळाडू होते. सिंधूने बॅडमिंटन हा खेळ आपल्यासाठी निवडला. यासाठी तिने आदर्श समोर ठेवला होता तो पुलेला गोपीचंद यांचा. जे तिचे प्रशिक्षक आहेत.

2016 मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये स्पेनच्या कॅरोलिना मरीन सोबतचा सिंधूचा अंतिम सामना संपूर्ण देशाने पाहिला. तिने पहिला सेट जिंकला होता. शेवटच्या सेटपर्यंत भारताला सुवर्ण पदक मिळेल अशी आशा होती. सिंधू यामध्ये सुवर्ण पदक मिळवू शकली नाही. तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, बॅडमिंटन खेळामध्ये ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. मात्र, लगेच काही महिन्यांनी झालेल्या सामन्यात तिने कॅरोलिनाला हरवत विजय संपादन केला. ऑलिम्पिक स्पर्धांचे जगभर एक वेगळ्या प्रकारचे वलय असल्याकारणाने सिंधूच्या या इंडियन ओपन सिरीजच्या विजयाची अधिक कुठे चर्चा झाली नाही.

अनेकदा असे आढळून आले आहे, की सिंधू एखाद्या मोठया स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारते, पण अजिंक्‍यपद तिला हुलकावणी देते. मात्र, आज तिने अनेक जागतिक स्पर्धांमध्ये स्वत:च्या सुवर्ण कामगिरीने नावलौकिक मिळविला आहे. यामुळे भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चिले जात आहे.

एरो इंडिया, एअर शोमध्ये सहभागी होत, तेजस विमानातून भरारी घेणाऱ्या सिंधूने देशातील महिला सैनिकांच्या कार्याचा गौरव केला. भारतीय बनावटीच्या विमानातून उड्डाण करणारी ती पहिली क्रीडापटू ठरली आहे.

ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर आपण भारतीय लोकांनी आपली मानसिकता दाखवून दिली. तिकडे सिंधू देशासाठी खेळत होती आणि इकडे लोक तिची जात शोधण्यात व्यस्त होते. आपली ही चुकीची मानसिकता बदलून आपण खिलाडूवृत्ती जोपासली तर नक्कीच काही पदके देशाच्या खात्यामध्ये वाढू शकतील.

सिंधूने अनेक विक्रम आपल्या नावावर केलेले आहेत. काहीही असले तरी सातत्यपूर्ण सराव, प्रचंड मेहनत आणि शिस्तबद्ध आयुष्य जगत ती बॅडमिंटन या खेळाला नावारूपास आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहे.

सिंधूला खेळातील तिच्या योगदानाबद्दल असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत. यामध्ये राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री आदींचा समावेश होतो. ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी आठ महिने ती मोबाईल आणि सर्व समाज माध्यमांपासून दूर होती. हे सगळे शक्‍य झाले तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यामुळे. त्यांनी विशेष स्पर्धेसाठी, विशेष तयारीची गरज असते हा विचार तिला सांगितला. यामुळे सराव, आहार, समाज माध्यमे आणि एकंदरीत चोवीस तासांचे नियोजन त्यांनी केले होते.

2020 च्या टोकियो येथील ऑलिम्पिकमध्ये ती नक्कीच सुवर्ण कामगिरी करेल या विश्‍वासासह भारताची शटल क्वीन पी.व्ही. सिंधूला वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.

– श्रीकांत येरूळे

Leave A Reply

Your email address will not be published.