मागणीच्या तुलनेत 22 टक्के कमी पुरवठा
84 मेट्रिक टन पुणे जिल्ह्याला कमी प्राणवायू
सागर येवले
पुणे – मागील महिनाभरात पुणे विभागात ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. विभागातून तब्बल 511.6 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून, सध्या 399.06 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत आहे. मागणीच्या तुलनेत 22 टक्के टन ऑक्सिजन कमी मिळत आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन सुरू असल्याबाबत केंद्र-राज्य पातळीवरून कितीही दावे-प्रतिदावे केले जात असले, तरी पुण्याला ऑक्सिजन कमी मिळतो आहे, हे प्रशासकीय अहवालातूनच उघड झाले आहे.
पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाचही जिल्ह्यांत करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 190 सक्रिय बाधित आहेत. सातारा येथे 17 हजार 114, सांगली 11 हजार 10, सोलापूर 13 हजार 27 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 6 हजार 613 सक्रिय बाधित आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधित संख्या आणि अत्यवस्थ होणाऱ्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे आपसूकच ऑक्सिजनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामध्ये सर्वाधिक मागणी पुणे जिल्ह्यात असून, एकट्या पुणे शहरात ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या तब्बल 7 हजारांजवळ आहे. त्यामुळे सध्या पुणे शहरासह जिल्ह्याला एकूण 386.1 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. मात्र, सध्या केवळ 302.5 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. जवळपास 84 मेट्रिक टन पुरवठा कमी आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात मागणीपेक्षा 6 मेट्रिक टन, साताऱ्यामध्ये 7 मेट्रिक टन, सांगली 14 मेट्रिक टन तर कोल्हापूर जिल्ह्याला 2 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे. तो सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची दररोज रात्रंदिवस दमछाक होत आहे. अशा परिस्थितीतही रुग्णालयांना वेळेत ऑक्सिजन पुरवठ्याबाबत दिवस-रात्र काम करत आहे.