विम्बल्डन – टेनिस क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ख्याती असलेल्या विम्बल्डन खुल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू पाहत असतो. येथेही हेच स्वप्न साकार करताना रूमानियाच्या सिमोना हॅलेप हिने अमेरिकन खेळाडू सेरेना विल्यम्सचा दणदणीत पराभव केला. तिने केवळ 55 मिनिटांमध्ये हा सामना 6-2, 6-2 असा जिंकला.
हॅलेपचे हे या स्पर्धेतील हे पहिलेच विजेतेपद आहे. ग्रॅंड स्लॅम करिअरमध्ये तिचे हे दुसरे अजिंक्यपद आहे. गतवर्षी तिने फ्रेंच स्पर्धा जिंकली होती. 27 वर्षीय खेळाडू हॅलेपने 37 वर्षीय सेरेनाला फारशी संधी दिली नाही.
हॅलेपने सामन्याच्या प्रारंभापासूनच वर्चस्व गाजविले. तिने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ करीत सर्व्हिसब्रेक मिळविले. तिच्या आक्रमक खेळापुढे सेरेनाला परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. तसेच सेरेनाकडून सर्व्हिसच्याही चुका झाल्या. त्याचा फायदा हॅलेपला मिळाला. तिने पहिला सेट सहज घेतल्यानंतर सेरेना दुसऱ्या सेट घेण्यासाठी संघर्ष करील अशी अपेक्षा होती. तथापि विजय मिळविण्याच्या निर्धाराने खेळणाऱ्या हॅलेपच्या चतुरस्त्र खेळापुढे सेरेनाच्या मर्यादा स्पष्ट दिसून आल्या.
हॅलेपने सांगितले की, विजेतेपद मिळविण्याची मला खात्री होती. परंतु हा सामना एकतर्फी होईल अशी मला अपेक्षा नव्हती. अर्थात सेरेना ही महान खेळाडू आहे व तिच्यावर मात करीत हे यश मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. विम्बल्डनचे विजेतेपद मिळविण्याचे भाग्य मला मिळाले याहून दुसरा कोणताच संस्मरणीय क्षण असू शकत नाही.