सिम्बा वॉरियर्सचा एकतर्फी विजय

रिमा मल्होत्राची सुरेख गोलंदाजी; मुक्‍ता मगरेची अर्धशतकी खेळी

पुणे, दि. 23 -एचपी महिला प्रीमियर लीग टी-क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीत सध्याच्या भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू असलेल्या रिमा मल्होत्राने (3-11) केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीसह मुक्ता मगरेने (नाबाद 56) केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सिम्बा वॉरियर्सने एचपी ग्रुपचा 3 गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदविला. 

व्हिजन क्रिकेट मैदान, सिंहगड रोड व डीएसके विश्‍व क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या सिम्बा वॉरियर्सने या सामन्यात विजय मिळवत पुनरागमन केले. सिम्बा वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना एचपी ग्रुपला 20 षटकात 8 बाद 107 धावाच उभारता आल्या.

यात संजूला नाईकने 45 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने नाबाद 50 धावांची खेळी करून संघाची एक बाजू सांभाळली. तसेच प्रियांका घोडके 20, रसिका शिंदे 14 यांनी धावा काढून साथ दिली. सिम्बा वॉरियर्सच्या रिमा मल्होत्राने आपल्या अनुभवाचा वापर करत 11 धावात 3 फलंदाज बाद करून संघाच्या विजयाचा पाया रचला.

हे आव्हान सिम्बा वॉरियर्सने 17.2 षटकात 7 बाद 110 धावा करून पूर्ण केले. सलामवीर मुक्‍ता मगरेने 52 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 56 धावा करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. मुक्‍ताला प्रियांका गारखेडे 14, पुर्वजा वेर्लेकर 12, माधुरी आघाव 12 यांनी धावा काढून साथ दिली. एचपी ग्रुपकडून संजूला नाईकने 16 धावात 3, तर प्रियांका घोडकेने 2 आणि इशा पठारेने 1 गडी बाद केला. सामन्याची मानकरी मुक्ता मगरे ठरली.

संक्षिप्त धावफलक –

एचपी ग्रुप : 20 षटकात 8 बाद 107 धावा (संजूला नाईक नाबाद 50, प्रियांका घोडके 20, रसिका शिंदे 14, रिमा मल्होत्रा 3-11, प्रियांका गारखेडे 1-6, श्रुती महाबळेश्‍वर 1-11) पराभूत वि. सिम्बा वॉरियर्स : 17.2 षटकात 7 बाद 110 धावा (मुक्ता मगरे नाबाद 56, प्रियांका गारखेडे 14, पुर्वजा वेर्लेकर 12, माधुरी आघाव 12, संजूला नाईक 3-16, प्रियांका घोडके 2-21, इशा पठारे 1-18)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.