नवी दिल्ली – मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरात शुक्रवारी संध्याकाळी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 530 रुपयांची वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात 1400 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 43,900 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,900 रुपये इतका आहे. गेल्या महिन्याभरापासून सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होतं असल्याचं पहायला मिळतंय.
चांदीच्या दरात गुरुवारच्या तुलनेत तब्बल 1400 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी आता 65,000 रुपये मोजावे लागणार आहेत. गुरुवारी हा दर 63,600 रुपये इतका होता. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. गेल्या 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव हा 67,500 इतका होता, तर 31 मार्चला तो 65,500 रुपये इतका होता. .
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
दरम्यान, अजूनही भारतामध्ये सोन्याचे दर तुलनेने बरेच कमी आहेत. त्यामुळे काही गुंतवणूकदार आगामी काळात खरेदी वाढविण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यानंतर दीर्घ पल्ल्यात सोन्याची खरेदी फायदेशीर ठरू शकते असे काही विश्लेषकांना वाटते. काही महिन्यापूर्वी भारतात सोन्याचे दर 58 हजार रुपयांपर्यंत वाढले होते मात्र नंतर आर्थिक परिस्थिती सुधारू लागल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात बरीच घट झालेली आहे. त्यामुळे लग्नासाठी सोन्याची खरेदी करणाऱ्यांना सध्याचा काळ योग्य समजला जात आहे.