मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. चप्पल, बांगड्या फेकून आंदोलकांनी निदर्शने केली. या सर्व घडामोडी दरम्यान शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांशी संयम राखण्याचे आवाहन करत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृतीचे कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.
शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी घराबाहेर येत आंदोलकांना शांत होण्याचे आवाहन केले; मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत, तुम्ही आधी शांत व्हा. त्याशिवाय बोलता येणार नाही, असे त्या सांगत असतानाही कामगारांची घोषणाबाजी सुरूच होती. त्यानंतर मात्र घरात माझे आई, बाबा आणि मुलगी आहे. त्यांची सुरक्षा मला पाहू दे, असे म्हणत सुप्रिया सुळे घरात गेल्या.
सुप्रिया सुळेंच्या या कृतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी कौतुक केलं आहे. आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुंबई येथील निवासस्थानी घडलेला प्रकार धक्कादायक होता. परंतु दडपशाही वा दबावतंत्र वापरणे असे काहीही न करता सुप्रिया सुळे स्वतः आंदोलकांसमोर गेल्या व त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. हे खरे लोकशाहीला शोभणारे नेते आहेत, असं अमोल कोल्हे यांनी म्हटले.