औंधच्या पहिलवानाची युथ गेम्समध्ये ‘रौप्य मुसंडी’

गुवाहाटी येथील स्पर्धेत विराज रानवडे याचे यश

औंध – गुवाहाटी येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये औंध तालीम संघाचा विराज रानवडे यास कुस्ती प्रकारात रौप्यपदक मिळाले. या स्पर्धांसाठी देशभरातील खेळाडूंनी उत्साहाने भाग घेतला होता. यूथ गेम्स मध्ये 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 6800 खेळाडूंनी 20 स्पर्धांमध्ये भाग घेतला. या स्पर्धा दि. 10 ते 22 जानेवारी दरम्यान खेळवल्या गेल्या होत्या.

या स्पर्धेतील कुस्ती विभागांमध्ये पुण्यामधील औंध येथील विराज विकास रानवडे या मल्लाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये त्याने रौप्य पदक आपल्या नावे केले आहे. राष्ट्रीय स्तरावर त्याने केलेली ही कामगिरी उल्लेखनीय आहे. एवढेच नव्हे तर विराज ने सुवर्णपदक देखील पटकावले असते परंतु, सेमीफायनलमध्ये पायाला झालेल्या दुखापतीमुळे तो फायनल मध्ये खेळू शकला नाही.

राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत दिल्ली, पंजाब, बिहार, मध्यप्रदेश व इतर राज्य संघातील खेळाडूंना पराभूत करून तो सेमी फायनल मध्ये पोहोचला होता. सेमीफायनलमध्ये विराजने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूला पराभूत करून त्याने फायनलमध्ये धडक मारली. सेमीफायनल दरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला या स्पर्धेमधून माघार घ्यावी लागली. या स्पर्धेसाठी त्याने औंध कुस्ती केंद्रांमध्ये प्रशिक्षक विकास रानवडे यांच्या मार्गद्‌शनाखाली सराव केला होता.

एन.आय.एस. कोच किशोर नखाते, सचिन सोनवणे व कोच अभिषेक कांबळे, मा. राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्य केदार कदम, राष्ट्रीय खेळाडू तुषार सोमवंशी, शासकीय कोच, क्रीडा अधिकारी संदीप वांजळे, शासकीय प्रशिक्षक राजाभाऊ कोळी यांनी विराजला मार्गदर्शन केले. विराज याचे वडील विकास रानवडे हे देखील पहिलवान असल्याने कुस्तीचा वारसा त्याला वडिलांकडूनच मिळाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.