जेजुरी – महाराष्ट्रचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दसरा उत्सवाच्या नियोजनानिमित्त श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी आणि खंडोबा पालखी सोहळा समितीची बैठक रविवारी (दि. 6) मल्हार भक्त निवासात आयोजित करण्यात आली होती. यावेळी दसरा व सोमवती उत्सवासाठी मानाचा असणारा चांदीचा आरसा नाभिक समाजाचे मानकरी राऊत परिवाराकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी देवसंस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे, संदीप जगताप, पालखी सोहळाप्रमुख गणेश आगलावे, वतनदार-इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, रमेश राऊत, जलिंदर खोमणे, संतोष खोमणे, रामदास राऊत, सुशील राऊत, किसन कुदळे, सुंदर खोमणे, माजी विश्वस्त सुधीर गोडसे, नितीन राऊत, बंटी खान, पोलीस निरीक्षक अंकुश माने उपस्थित होते.
खंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ यात्रा भरत असून, प्रत्येक यात्रा व उत्सवाला विविध जाती-धर्माच्या नागरिकांना वेगवेगळे मान आहेत. वर्षातून दोन वेळा सोमवती यात्रा व दसरा उत्सवाला देवाला आरसा दाखविणे आणि आरशातून देवभेट करण्याचा मान येथील नाभिक सामाजाच्या राऊत परिवाराला आहे. राऊत परिवाराकडे असणारा हा मानाचा आरसा जीर्ण झाल्याने देवसंस्थानच्या वतीने चांदीचा आरसा उत्सवासाठी देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
देवसंस्थानच्या वतीने सुमारे एक किलो चांदी वापरून हा आरसा तयार केला आणि बैठकीत नाभिक समाजाचे मानकरी रामदास राऊत, सुशील राऊत व माजी विश्वस्त नितीन राऊत यांच्याकडे सुपूर्द केला. कडेपठार देवस्थान या सोहळ्यासाठी सहकार्य करीत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. खंडोबा देवाच्या यात्रा उत्सवासाठी 28 बहुजन समाजातील ग्रामस्थांना विविध मान असून, ग्रामस्थ, भविक व मानकरी यांचे सर्व मानपान अबाधित ठेवून रूढी, परंपरा जपल्या जातील, असे यावेळी विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप यांनी सांगितले.