Pimpri : श्री दत्त मंदिराचा रौप्यमहोत्सव उत्साहात

संभाजीनगर : गुरुदत्त सेवा मंडळ यांच्यावतीने श्री दत्त मंदिर, संभाजीनगर येथे रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला.
सकाळी टेंबे स्वामी महाराज (श्री क्षेत्र नारायणपूर) यांच्या उपस्थितीत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. आकर्षक फुलांच्या सजावटीने नटवलेल्या रथातून श्री दत्त महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. शोभायात्रेत विविध धार्मिक दिंड्या, टाळ-मृदंग पथके, भजनमंडळे, तसेच महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रसंगी भारत नाना क्षिरसागर (श्री क्षेत्र नारायणपूर) यांचे प्रवचन झाले. त्यांनी बालकांमध्ये अध्यात्म, संस्कार आणि भक्तिभाव याबद्दल प्रेरणादायी विचार मांडले. कार्यक्रमादरम्यान गुरुदत्त सेवा मंडळाच्यावतीने अनेक मान्यवरांचा महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
दुपारी वैदिक मंत्रोच्चारात यज्ञ सोहळा संपन्न झाला. होम-हवन, आर्तिके वातावरणात झालेला हा सोहळा भाविकांसाठी अतिशय मंगलमय ठरला. मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होत दत्तमहाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. गुरुदत्त सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा आध्यात्मिक सोहळा अविस्मरणीय ठरला. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दैवी सोहळ्याचा लाभ घेतला. गुरुदत्त सेवा मंडळ परिवाराच्या वतीने सर्व भाविकांचे आभार मानण्यात आले.





