पेस्ट कंट्रोल कंपन्यांची करोना काळात चांदी

पिंपरी – करोनाबाधित रुग्ण सापडलेल्या घरांचे स्थानिक निर्जंतुकीकरण करणे स्वराज्य संस्थांकडून थांबविण्यात आल्याने आता खासगी पेस्ट कंट्रोल कंपन्यांकडून घर निर्जंतुकीकरण करण्यावर नागरिकांचा भर आहे. त्यामुळे या कालावधीत पेस्ट कंट्रोल कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

करोनाचा प्रादूर्भाव होण्यापूर्वी मच्छर, ढेकूण, वाळवी, पाल, झुरळ, माशा, उंदीर, कोळी व किटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेस्ट कंट्रोल करणे आवश्‍यक होते. आतापर्यंत याच बाबींकरिता पेस्ट कंट्रोल केले जात होते. एप्रिल महिन्यापर्यंत पेस्ट कंट्रोल कंपन्यांकडून पारंपारिक पद्धतीचे पेस्ट कंट्रोल केले जात होते. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि करोना निवासस्थानाच्या परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या जंतुनाशक फवारणीमुळे रुग्णाच्या अंतर्गत घराच्या निर्जंतुकीकरणाचा प्रश्‍न निर्माण झाला.

 तसेच करोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना होम क्‍वारंटाइनची गरज असल्याने खासगी पेस्ट कंट्रोल कंपन्यांकडून घराचे निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक झाले आहे. त्यामुळे शहरातील खासगी पेस्ट कंट्रोल कंपन्यांच्या कामाचा व्याप वाढला आहे. पारंपरिक पद्धतीने केले जाणाऱ्या पेस्ट कंट्रोलबाबत आता या कंपन्यांकडे विचारणादेखील होत नाही. तर आरोग्यविषयक जागृती निर्माण झाल्याने पेस्ट कंट्रोलऐवजी घर निर्जंतुकीकरणाकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. 

पारंपरिक पेस्ट कंट्रोलसाठी एकही कॉल नाही
एप्रिल महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने घर निर्जंतुकीकरणासाठी मागणी वाढत आहे. तर पारंपारिक पद्धतीचे पेस्ट कंट्रोल केले जात नाही. एप्रिल महिन्यानंतर पारंपारिक पेस्ट कंट्रोलची विचारणा करणारा एकही कॉल आला नसल्याची माहिती पेस्ट कंट्रोल व्यावसायिकांनी दिली आहे.

शहरातील व्यावसायिक वाढले
एप्रिल महिन्यापर्यंत शहरात पेस्ट कंट्रोल करण्याचे काम करणारे 30 ते 35 व्यावसायिक होते. मात्र, करोनामुळे घर निर्जंतुकीकरणाची मागणी वाढल्याने अनेक तरुणांनी या व्यवसायात पदार्पण केले आहे. आता ही संख्या 50 वर पोहोचली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच संकेतस्थळ तयार करुन पेस्ट घर निर्जंतुकीकरणाची जाहिरात केली जात आहे. घराच्या आकारावर निर्जंतुकीकरणाचे दर ठरविण्यात आले आहेत. वन बीएचके सदनिकेसाठी दीड हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. तर करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर संबधित घर चोवीस तासानंतर निर्जंतुक केले जात आहे. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत निर्जंतुकीकरणाचे काम होत असून, हे काम करताना सर्व खबरदारी घेतली जात असल्याचा दावा या व्यावसायिकांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.