Sikkim Landslide । सिक्कीममध्ये पडणाऱ्या सततच्या पावसाने आणि भूस्खलनामुळे परिस्थिती बिकट झालीय. भूस्खलनामुळे उत्तर सिक्कीम पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. याठिकाणी 2000 पर्यटक अजूनही येथे अडकून पडलेत. मंगण ते लाचुंगपर्यंत अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. सिक्कीम प्रशासनाकडून पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पर्यटकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरही सज्ज आहेत, मात्र खराब हवामानामुळे मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत.
सुमारे 50 पर्यटकांना तात्पुरत्या मार्गाने कसेतरी वाचवून गंगटोकला नेण्यात आले. सध्या परिस्थिती अशी झाली आहे की, उत्तर सिक्कीमच्या बाधित भागातही मदत सामग्री नीट पोहोचत नाहीये. मंगळवारी सकाळी पाऊस आणि भूस्खलनानंतर बंगाल आणि सिक्कीम सीमेवरील ऋषीखोला येथे राष्ट्रीय महामार्ग-10 वर वाहतूक ठप्प झालीय. यापूर्वी सतत पाऊस आणि दरड कोसळल्याने सिक्कीममधील मंगन जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत.
सिक्कीमचा पश्चिम बंगालशी संपर्क तुटला Sikkim Landslide ।
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग 10 पुन्हा खचला आहे. सिक्कीमचा पश्चिम बंगालशी संपर्क तुटला आहे. वालुखोला आणि लिहूवीर भागात राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खडक पडले असून त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. मात्र, जिल्हा प्रशासन रस्ता सुरळीत करण्यात झपाट्याने व्यस्त आहे.
आठवडाभरापासून पर्यटक अडकून Sikkim Landslide ।
याआधी सोमवारी दुपारी मंगण जिल्ह्यातील तुंगमध्ये अडकलेल्या पर्यटकांना रस्त्याने बाहेर काढण्याचे काम सुरू झाले होते. या पथकाचे नेतृत्व मंगणचे जिल्हा दंडाधिकारी हेमकुमार छेत्री करत होते. गेल्या आठवडाभरापासून लाचुंग शहरात काही परदेशी नागरिकांसह पर्यटक अडकून पडले आहेत. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनांमुळे मंगण जिल्ह्यातील अनेक भागात रस्ते आणि दळणवळण नेटवर्क विस्कळीत झाले आहे, ज्यामुळे देशाच्या इतर भागाशी संपर्क विस्कळीत झाला आहे.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) मंगण जिल्ह्यातून वाहनांची वाहतूक सुलभ करण्यासाठी रस्त्यांचे जाळे पुनर्संचयित करण्यात व्यस्त आहे. सिक्कीममध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. अनेक भागात वीज, अन्नपुरवठा आणि मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाले आहेत.