अमेरिकेत शिख पोलिस कर्मचाऱ्याची हत्या

ह्युस्टन  – अमेरिकेतील टेक्‍सास प्रांतात वाहतूक पोलिस म्हणून काम करणाऱ्या मूळ भारतीय असलेल्या एका शिख पोलिस कर्मचाऱ्याची एका अज्ञात बंदुकधाऱ्याने गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. टेक्‍सास प्रांतातील पोलिस दलामध्ये काम करणारे ते पहिलेच शिख नागरीक होते. गेल्या दहा वर्षांपासून ते तेथे कार्यरत होते.

संदीपसिंग धालीवाल असे त्यांचे नाव आहे. ते चाळीशीतील गृहस्थ होते. ते वाहतूक नियंत्रकाच्या ड्युटीवर असताना त्यांनी एक कार थांबवली त्यावेळी कार मधील व्यक्तीने त्यांना बाहेर येऊन थेट गोळ्याच घातल्या. ही व्यक्ती आणि एक महिलाही त्या गाडीत होती. त्यानंतर हल्लेखोर एका शॉपिंग कॉम्लेक्‍स मध्ये शिरला.

पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांनी पोलिस दलात काम करताना अनेक उपयुक्त उपक्रम राबवले होते. त्यामुळे पोलिस दलात ते विशेष लोकप्रिय होते. नुकत्याच येऊन गेलेल्या चक्रीवादळातही त्यांनी लोकांच्या मदतीचे मोठे काम केले होते असे टेक्‍सासच्या शरीफांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.