पुणे – चविष्ट, मुलायम सिहोर गव्हाची आवक सुरू

पुणेकरांची पसंती : मध्यप्रदेशसह गुजरातमधूनही आयात


गतवर्षीच्या तुलनेत भावात प्रतिक्विंटल 100 ते 150 रुपयांनी वाढ

पुणे – मध्य प्रदेश येथून सिहोर गव्हाची मार्केटयार्डातील भुसार बाजारात आवक सुरू झाली आहे. याबरोबरच सध्या बाजारात गुजरात येथूनही मोठ्या प्रमाणात सिहोर गहू येत आहे. चविष्ट, मुलायम, कसदार असलेल्या मध्यप्रदेशातील सिहोर गव्हाला पुणेकरांची पसंती मिळत असल्याचे चित्र बाजारात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाच्या भावात प्रतिक्विंटलमागे 100 ते 150 रुपयांनी वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गहू उत्पादक राज्यांमध्ये उत्पादनात मोठी वाढ झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. खरीप हंगामात चालू वर्षी पावसाने उत्तम साथ दिलेली आहे. तसेच अनुकूल हवामानामुळे त्याचा फायदा रब्बीतील पिकांनाही मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या मध्यप्रदेशातील विदेशा, सिहोर येथून 9 ते 10 टन तर गुजरातमधील हिम्मतनगर, भावनगर येथून 10 ते 12 टन गहू बाजारात दाखल होत आहे. गेल्या वर्षी सिहोर गव्हाच्या प्रतिक्विंटलला 3 हजार 700 ते 4 हजार 200 रुपये भाव मिळत होता. मात्र, यंदा सिहोरच्या भावत 150 रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी, मध्यप्रदेशातील सिहोरच्या प्रतिक्विंटलला 3 हजार 900 ते 4 हजार 400 रुपये व गुजरातच्या गव्हाला 2 हजार 650 ते 2 हजार 750 रुपये दर मिळत आहे.

बाजारात गव्हाची समाधानकारक आवक होत आहे. 15 मे नंतर गव्हाच्या आवकेत वाढ होईल. गेल्या वर्षी गव्हाच्या पिकाला अवकाळीचा फटका बसल्याने गहू काळवंडला होता. मात्र, यंदा देशभरातील गहू उत्पादक राज्यांमध्ये सिहोर गव्हाचे उत्पादन चांगले झाले असून दर्जाही चांगला आहे. थंडीमुळे गहू चांगला वाढला असून त्याला रंगही आला आहे.
-विजय मुथा, गव्हाचे व्यापारी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.